धुळे | जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा – प्राचार्य डॉ. संजीव गिरासे | पुढारी

धुळे | जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा - प्राचार्य डॉ. संजीव गिरासे

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा- आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवनात खळखळून हसा. येणाऱ्या संकटांना, प्रश्नांना धैर्याने सामोरे जा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांनी केले. ते पिंपळनेर महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.

‌‌या प्रसंगी व्यासपीठावर पिंएसो चे अध्यक्ष आर.एन.शिंदे, कॉलेज कमिटी चेअरमन धनराज राजमल जैन, प्रथम वनभूषण पुरस्काराचे मानकरी चैत्राम पवार, संचालक डॉ. विवेकानंद शिंदे, प्राचार्य के.डी.कदम, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.डी.बी.जाधव, प्रा. डॉ.डब्ल्यूबी.शिरसाठ, प्रा. पी.एम.सावळे, विद्यार्थी प्रतिनिधी कु.पल्लवी बोरसे हे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. गिरासे पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी क्षमता असतात, एखादा कलागुण असतो. जे उत्तम आहे ते मनापासून करा. आपले विचार व भावना आपल्या भाषेत स्पष्टपणे मांडा. भाषा कौशल्य विकसित करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. चैत्राम पवार म्हणाले की, जल-जंगल-जमीन असेल तरच जीवन आहे. मनुष्य प्राण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी या बाबींचे संवर्धन करावेच लागेल. मला मिळालेला पुरस्कार हा आपणासर्वांचा सन्मान आहे असे मी मानतो. महाराष्ट्र शासनाचा प्रथम वनभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने चैत्राम पवार यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना आर.एन.शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपआपल्या गावात कबड्डी, खो-खो या खेळांच्या, वाद्य-वृंदाच्या टीम तयार करा. त्यातून स्वयंरोजगार निर्माण होऊ शकेल. उत्तम शेती करा असे आवाहन ही त्यांनी तरुणांना केले.

प्रास्ताविक प्राचार्य के.डी. कदम यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.डॉ.बी. सी.मोरे यांनी करून दिला. महाविद्यालयीन शैक्षणिक घडामोडींचा अहवाल स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.डी.बी. जाधव यांनी सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सी.एन.घरटे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी व गुणवंत प्राध्यापक यांचा सत्कार व गुणगौरव प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. जिमखाना विभागाचे जनरल चॅम्पियनशिप मुलींमधून कु. हर्षदा शरद अहिरराव तर मुलांमधून कैलास आप्पा पानपाटील याला प्रदान करण्यात आला. या शैक्षणिक वर्षाचे जनरल चॅम्पियनशिप चा अवॉर्ड कु.चेतना प्रवीण निकुम हिला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या पारितोषिक वितरणाचे संचलन प्रा.डॉ. संजय खोडके व प्रा.डॉ.एन. बी. सोनवणे यांनी केले तर आभार प्रा.एम.व्ही.बळसाने यांनी मानलेत.या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Back to top button