अंतराळात दिसला ‘नेकलेस नेब्युला’! | पुढारी

अंतराळात दिसला ‘नेकलेस नेब्युला’!

वॉशिंग्टन : नेब्युला हे अनेक आकाराचे असतात. कधी त्यांची रचना एखाद्या प्राण्यासारखी दिसते तर कधी डोळे, हात अशीही दिसते. आता ‘नासा’ने अशाच नेकलेसच्या आकाराच्या चमकदार नेब्युलाचे छायाचित्र टिपले आहे.

नासाच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेला हा ‘कॉस्मिक ज्वेलरी’ चा फोटो हबल स्पेस टेलिस्कोपने टिपला आहे. ‘नेकलेस नेब्युला’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण पृथ्वीपासून 15 हजार प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे. फोटो पाहताच प्रथमदर्शनी एखादा दागिन्यातील हारच जणू भासत आहे. या चित्राबाबत नासाचे म्हणणे आहे की, ते सूर्यासारख्या जुन्या तार्‍यांनी तयार केले आहे. पहिले दोन तारे एकमेकांभोवती फिरत राहिले. मग एक तारा विस्तारला आणि त्याच्या साथीदार तार्‍याला घेरला. तथापि, लहान तारा त्याच्या साथीदार तार्‍याभोवती फिरत राहिला. अशा प्रकारे ‘नेकलेस नेब्युला’ तयार झाला.

नासाचे म्हणणे आहे की, तारे आणि वायूंचे हे कॉम्बिनेशन एखाद्या गळ्यातल्या हारासारखे दिसते. 13 मार्च रोजी पोस्ट केलेल्या या फोटोला आतापर्यंत 70 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यावर अनेक कमेंटस्ही केल्या जात आहेत. लोक आश्चर्यचकित नजरेने या चित्राकडे पाहात आहेत. अवकाशात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या हळूहळू उजेडात येत आहेत. नासा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

Back to top button