Bus workers strike : संपाला हिंसक वळण; आतापर्यंत ५० गुन्ह्यांची नोंद | पुढारी

Bus workers strike : संपाला हिंसक वळण; आतापर्यंत ५० गुन्ह्यांची नोंद

मुंबई, पुढारी वृत्तसेवा

एस. टी. महामंडळाचे (Bus workers strike) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या कर्मचार्‍यांच्या संपाला हिंसक वळण लागले आहे. संप काळात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त गुन्हे एस. टी. प्रशासनाने नोंदविले आहेत. यात 32 गुन्हे एस.टी. बसवर दगडफेक केल्याप्रकरणी आहेत.

शनिवारी एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी 13 बसवर दगडफेक झाली. यापैकी एका दगडफेकीतील संशयित हा चक्क महामंडळाचा वाहकच असून त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडला. शनिवारी राज्यात विविध ठिकाणी 13 बसवर  दगडफेक झाली. यात चालक, वाहकही जखमी झाले. दगडफेक करणार्‍या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात महामंडळाच्या (Bus workers strike) वतीने स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, महामंडळाने निलंबनाची कारवाईही अधिक तीव्र केली असून रविवारपर्यंत 6 हजार 497 कर्मचारी निलंबित केले आहेत. रोजंदारीवरील एक हजार 525 जणांची सेवासमाप्त केली आहे.  रविवार हा सुट्टीचा दिवस असूनदेखील महामंडळाने कारवाई सुरूच ठेवली. रविवारी कायमस्वरूपी कर्मचार्‍यांपैकी 93 जणांना निलंबित केले.

तुम्हाला वाकवायला किती वेळ लागणार : आडम

राज्य परिवहन महामंडळ (एस. टी.) कर्मचार्‍यांना राज्य सरकारकडून पगारवाढीची घोषणा करण्यात आली असली, तरी एस.टी. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यावर वेळीच विचार करा, केंद्र सरकारला वाकवले, राज्य सरकारला वाकवायला वेळ लागणार नाही, असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते कॉ. नरसय्या आडम यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह राज्य सरकारला दिला. मुंबईतील आझाद मैदानात रविवारी संयुक्त किसान मोर्चाकडून शेतकरी किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आडम मास्तर बोलत होते.

पहा व्हिडीओ : म्हणूनच शाहू महाराजांनी कधीही व्यसन न करण्याचा निर्धार केला

हेही वाचा

Back to top button