डॉ. प्रतापसिंह जाधव : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे | पुढारी

डॉ. प्रतापसिंह जाधव : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजात एकजूट होऊन तो पुढे आला पाहिजे. त्यासाठी समाजात एकी असणे गरजेचे आहे. या समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुणे येथे झालेल्या यदुवंश मेळाव्यात रविवारी केले.

पुण्यातील बाणेर भागातील कुंदन गार्डनमध्ये यदुवंश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात यदुवंशातील यादव, जाधव, देशमुख, पाटील, बालवडकर अशा 57 आडनावांचे यदुवंशज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. जाधव यांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक प्रा. नामदेवराव जाधव यांनी केले. तसेच सरसेनापती धनाजी जाधव यांचे वंशज विक्रमराजे जाधव, पिलाजी जाधव यांचे वंशज अण्णासाहेब जाधव यांचीही व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. नामदेवराव जाधवलिखित ‘यदुवंश’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते झाले.

एकेकाळचे राज्यकर्ते आता याचककर्ते झाले…

यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रथम आयोजकांचे अभिनंदन करतो की, त्यांनी पुण्यात हा कार्यक्रम घेतला. कारण, आम्ही गेली चार वर्षे कोल्हापुरात असाच कार्यक्रम घेत आहोत. सगळ्या यादव, जाधवांचा मेळावा लखुजीराजे जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेतो. आपण जाधव, यादव कुळीच नव्हे, तर सर्व मराठा समाज राज्यकर्ते होतो. ते आता याचककर्ते झाले आहेत. त्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर रोजगारीच्या कामावर जात आहे.

एकवेळ अशी होती की, आम्ही लोक आम्हालाच आरक्षण नको, म्हणून सांगत होतो. आज परिस्थिती अशी झाली आहे की, आम्ही आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे काढतो आहोत. ‘एक मराठा, लाख मराठा’ या आंदोलनाची आम्ही कोल्हापुरात सुरुवात केली. नंतर राज्यभर मोर्चे निघाले.

मुंबईच्या मोर्चात मीदेखील सहभागी होतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो. त्यावेळी मोदींनीदेखील शांततेत व शिस्तीत निघालेल्या मोर्चाचे कौतुक केले होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर एखाद्या विद्यापीठाने श्‍वेतपत्रिका काढली पाहिजे. मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार आप्पा या सगळ्यांबरोबर मी काम केले आहे.

नाइलाजाने समाज रस्त्यावर उतरला

सगळ्यांना असे वाटायचे की, मराठ्यांमध्ये एकजूट कशाला हवी? मी ज्या ज्या मंत्र्यांशी बोलायचो तेव्हा त्यांना वाटायचे, आपण या मेळाव्याला जावे की नाही? आपण गेलो तर जातीयवादी होऊ. म्हणून कोणतेही मंत्री मेळाव्याला येत नव्हते, ही वस्तुस्थिती होती. मी माझ्या भाषणात टीका करत होतो. कारण मी स्पष्टवक्‍ता आहे.

माझी कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नाही. त्यामुळे स्पष्ट लिहितो. लोकांना माहिती आहे की, मी सडेतोड लिहितो. आज आपण मराठ्यांनी एकत्र आले पाहिजे. आज महाराष्ट्रात जे जे मराठा मुख्यमंत्री झाले, अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, या कोणालाच वाटले नाही की, मराठा समाजासाठी आपण काही करावे. त्यामुळे नाइलाजाने समाजालाच रस्त्यावर उतरावे लागले, असे डॉ. जाधव म्हणाले.

कॅलिफोर्नियात जाधव नावाचे विद्यापीठ

आपला यदुवंश मोठा आहे. जाधव हे नाव यादव या नावाचा अपभ्रंश होऊन तयार झाले आहे. आपल्या यदुकुळाला मोठा इतिहास असल्याने कॅलिफोर्नियामध्ये जाधव नावाचे विद्यापीठ आहे. कोलकातामध्येही या नावाने विद्यापीठ झाले आहे. आपल्यालाही एकत्र येऊन असे काहीतरी भव्य काम केले पाहिजे. आपण एकत्र येत नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंत डॉ. जाधव यांनी व्यक्‍त केली.

75 वर्षांचा इतिहास लवकरच तुमच्या हाती

माझी जी काही भाषणं आहेत त्याचा व ‘पुढारी’तील माझ्या अग्रलेखांचा एक मोठा ग्रंथ प्रकाशित होत आहे. माझं आत्मचरित्र मी लिहितोय. मी सगळा 75 वर्षांचा इतिहास त्यात मांडत आहे. तो तिन्ही भाषेत म्हणजे मराठी, इंग्रजी आणि हिंदीत प्रकाशित होतोय. तो लवकरच तुमच्या हाती येईल.

Back to top button