बीड: तलवाडा येथे तरुणांचे आमरण उपोषण: महिलांचे ठिय्या आंदोलन | पुढारी

बीड: तलवाडा येथे तरुणांचे आमरण उपोषण: महिलांचे ठिय्या आंदोलन

गेवराई, पुढारी वृत्तसेवा: गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे मागील २५ ते ३० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जागेचा पीटीआर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज (दि.१४) तलवाडा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या उपोषणस्थळी महिलांनी दिवसभर ठिय्या आंदोलन केले.

माजी मंत्री बदामराव पंडित, बीड जि.प.चे माजी अध्यक्ष – विजयसिंह पंडित, महेश अण्णा दाभाडे, गटविकास अधिकारी गेवराई, पोलिस अधिकारी व कर्मचारी, सा.बां.विभागाचे अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या युवकांची प्रकृती खालावली असून उपचारासाठी आलेले आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी यांच्याकडून उपचार घेण्यास आंदोलनकर्त्यांनी नकार दिला आहे.

तलवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे भव्यदिव्य असे बांधकाम करण्यात आलेले असून या चौकाची तलवाडा ग्रामपंचायतला मात्र नोंद नाही. या चौकाची नोंद करून पीटीआर मिळावा, यासाठी रोषण हात्ते, अनिकेत नाटकर, शुभम जैत, दादाराव रोकडे यांच्यासह ८ जण तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत पीटीआर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा उपोषणकर्ते युवक व गावातील महिलांनी घेतला आहे.

हेही वाचा 

Back to top button