‘भीमे’ची पातळी खालावली; नदीकाठच्या गावांना फटका : शेतपिके धोक्यात | पुढारी

‘भीमे’ची पातळी खालावली; नदीकाठच्या गावांना फटका : शेतपिके धोक्यात

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूरसह अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणाच्या (यशवंत सागर) पाणीपातळीत मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कमालीची घट झालेली दिसून येत आहे. परिणामी, दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना पाणीटंचाई जाणवणार आहे. तसेच नदीकाठच्या शेतपिकांनाही फटका बसणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीचा पाऊस काहीसा समाधानकारक झाल्यामुळे उजनी धरण उणेमधून प्लसमध्ये आले होते. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणात 60 टक्क्यांपर्यंतच उपयुक्त पाणीसाठा झाला होता. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीस दौंडच्या पूर्व भागातील भीमा नदीच्या पाण्याने तळ गाठला आहे. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने प्रचंड पाणीटंचाई जाणवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

उजनी धरण हे दौंड, इंदापूर, श्रीगोंदा, कर्जत, माढा व करमाळा या तालुक्यांच्या नदीकाठच्या गावांना वरदान ठरले आहे. उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधील पाण्यामुळे सिंचनाखाली असणारे क्षेत्र वाढवून हा भाग सुजलाम सुफलाम झाला. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्ता आली. परंतु, या वर्षी या भागात पाऊस समाधानकारक न झाल्याने उजनी धरण पूर्णक्षमतेने भरलेच नाही. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार असल्याचे जाणवू लागले आहे. उजनी धरणातून शेतीसाठी आवर्तने, उद्योग व व्यवसायासाठी पाणीपुरवठा, आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी पाणी, सोलापूर शहरासाठी धरणातून पाणी सोडले जाते. त्यामुळे बॅक वॉटरमधील सद्य परिस्थितीत दौंड, कर्जत व करमाळा या तालुक्यांतील शेती पाण्याअभावी धोक्यात आली आहे.

भीमा नदीची सध्याची पाण्याची परिस्थिती पाहता पुढील तीन महिने नदीपात्र कोरडे होण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु, पुणे जिल्ह्याच्या धरणसाखळीतून सर्व धरणांमधून थोडे थोडे पाणी भीमा नदीपात्रात सोडले तर नदीपट्ट्यातील शेतपिके वाचतील.

भाऊसाहेब कामठे, शेतकरी, हिंगणीबेर्डी

हेही वाचा

Back to top button