पैशाचा पाऊस; नांदोस हत्याकांड नेमकं घडलं कसं? | पुढारी

पैशाचा पाऊस; नांदोस हत्याकांड नेमकं घडलं कसं?

गणेश जेठे, सिंधुदुर्ग

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे नांदोस हत्याकांड सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नांदोस डोंगरावर घडले होते. या हत्याकांडात चार आरोपींनी मिळून तब्बल दहा जणांचा खून केला होता. त्यातील दोघा जणांच्या खुनामध्ये पुराव्याअभावी ते सुटले. मात्र, सहा जणांच्या खुनांचा गुन्हा शाबित होऊन चारही आरोपींना फाशीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयामध्ये फाशीच्या शिक्षेचे रूपांतर आता जन्मठेपेमध्ये झाले आहे. मात्र, आजही ती घटना आठवली की, प्रत्येक मालवणी माणसाच्या अंगावर शहारे येतात.

संबंधित बातम्या 

2003 सालची ही घटना आहे. डिसेंबर महिन्यात मालवण तालुक्यातील नांदोसच्या डोंगरावर काही महिला लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या असता, त्यांना तिथे काही मृतदेह दिसले. खबर मिळताच पोलिसांनी तिथे जाऊन तपासणी केली असता, एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ मृतदेह सापडले. या प्रकारामुळे संपूर्ण पोलिस खाते खडबडून जागे झाले. कोकणपट्टीतील सर्वाधिक शांत जिल्ह्यात इतके मृतदेह सापडावेत, ही घटना आश्चर्यचकित करणारी होती. त्यामुळे सगळी पोलिस यंत्रणा धडाडीने कामाला लागली आणि अगदी दोन-तीन दिवसांत पोलिसांना धागेदोरे सापडलेे. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार संतोष चव्हाण याच्यापर्यंत पोलिस पोहोचले.

संतोष चव्हाण हा त्या भागातच आपल्या मामाच्या घरी यायचा-जायचा. लहानपणापासून त्याला जादूटोण्याचे आकर्षण होते. त्यामुळे तसल्या काही भोंदूबुवांच्या संपर्कातही तो होता. आपणही असेच काहीतरी करून भरपूर पैसे मिळवावेत, असे संतोषला वाटायचे. त्यासाठी त्याने आपण पैशाचा पाऊस पाडू शकतो, अशी आवई उठवून दिली. संतोष चव्हाणला त्यासाठी अमित शिंदे, योगेश चव्हाण आणि महेश शिंदे हे मुंबईतील तीन साथीदार मिळाले होते.

एक लाख रुपये घेतो आणि त्याचे एक कोटी करून दाखवतो, असे आमिष दाखवत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे नाटक करत हा गुन्हा या चौघांनी केला होता. संतोष हा काहीकाळ मुंबईत रिक्षा चालविण्याचे काम करीत होता. त्यामुळे मुंबईतील काही लोकांशी त्याचा परिचय होता. मुंबईमध्ये माणसे हेरायची, त्यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवायचे आणि तिथून त्यांना नांदोस डोंगरावर आणून त्यांची हत्या करायची, असा हा कट होता. 14.11.2003 रोजी मुंबई-वाशी परिसरातील माळी कुटुंबातील केरूभाऊ माळी, त्यांची पत्नी अनिता आणि मुलगे संजय व राजेश यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना नांदोस डोंगरावर आणले आणि तिथे त्यांची हत्या केली. त्यापूर्वी 30.10.2003 रोजी विजयसिंह दुधे, संजय गवारे, दादासाहेब चव्हाण आणि विनायक उर्फ बाळा पिसाळ यांची त्याच नांदोस डोंगरावर या चौघांनी हत्या केली. हे आरोपी या लोकांना सिंधुदुर्गात पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आणायचे.

कणकवली किंवा मालवणमध्ये ठेवायचे. नांदोस डोंगरावर जाऊन हत्याकांड घडविण्याची तयारी करायचे आणि ठरल्या वेळेनुसार त्यांना नांदोस डोंगरावर पैशाचा पाऊस पाडला जाईल, असे आमिष दाखवून घेऊन जायचे आणि तिथेच त्यांची हत्या करायचे. ही हत्या करताना एकेकाला पुढे नेऊन त्यांची हत्या करायचे. इतर दोघे जण शंकर सारगे आणि हेमनाथ ठाकरे यांची हत्या नांदोस डोंगर वगळता इतर ठिकाणी करण्यात आली. त्यासंबंधीचे पुरावे सिद्ध होऊ शकले नाहीत. मात्र,अन्य खुनांमध्ये दोषी ठरवून न्यायालयाने चौघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फाशीची शिक्षा सुनावणारा हा पहिलाच खटला होता. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अजित भणगे आणि अ‍ॅड. प्रेमानंद नार्वेकर यांनी काम पाहिले होते आणि न्यायाधीश जे. एन. शानभाग यांनी फाशीच्या शिक्षेचा निकाल दिला होता.

संतोष चव्हाण बाबा बनायचा…

तीन लाखांचे तीन कोटी रुपये पैशाच्या पावसामध्ये होतील, असे हे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी मुंबईत या आरोपींनी अनेक ठिकाणी पैशाच्या पावसाचे खोटेनाटे प्रयोग करून दाखवले होते. अनेकांना जाळ्यात ओढले होते. ज्यांची हत्या झाली ते दहा जण मात्र या अंधश्रद्धेचे बळी पडले होते. संतोष चव्हाण हा नेहमी तथाकथित महाराज किंवा बाबाचे रूप धारण करायचा आणि पैशाच्या पावसाचे आमिष दाखवायचा. माळी कुटुंबातील चार जणांची हत्या ही दुर्मिळातील दुर्मीळ हत्या असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. केवळ पैशाच्या हव्यासापोटी हे हत्याकांड घडविण्यात आले होते. आजही त्या हत्याकांडाबाबत नेहमी चर्चा सुरू असते.

Back to top button