पसार बिबट्या 36 तासांनंतर पिंजर्‍यात; थर्मल सेन्सर ड्रोनच्या मदतीने शोध | पुढारी

पसार बिबट्या 36 तासांनंतर पिंजर्‍यात; थर्मल सेन्सर ड्रोनच्या मदतीने शोध

पुणे/कात्रज : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कात्रजमधील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील पिंजर्‍यातून पळालेला बिबट्या तब्बल 36 तासांच्या शोध मोहिमेनंतर मंगळवारी (दि.5) रात्री नऊच्या सुमारास सापडला. या शोध मोहिमेत थर्मल सेन्सर असलेल्या ड्रोनची मदत घेतली. हम्पीमधील प्राणिसंग्रहालयातून तीन महिन्यांपूर्वी सचिन नावाचा बिबट्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झाला. तो साडेसात वर्षांचा आहे. सोमवारी पहाटे तो संग्रहालयातील पिंजरा तोडून पसार झाला होता. सोमवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान तो येथील किचनजवळील सीसीटीव्हीत दिसला. बिबट्या पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून शोधकार्य हाती घेण्यात आले.

सोमवारी सकाळी नऊ वाजता हाती घेण्यात आलेले शोधकार्य सोमवारी दिवसभर, रात्रभर आणि मंगळवारी दिवसभर सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तळ्याजवळ बिबट्या सापडला. त्याला तत्काळ पिंजर्‍यात बंद करण्यात आले. महापालिका, पोलिस व वन विभाग आणि पुणे अ‍ॅनिमल वेलफेअर संस्थेच्या रेस्क्यू टीमसह 150 जणांनी शोधकार्यात योगदान दिले. या शोधकार्यात हायड्रोलिक शिड्या, ड्रोन, थर्मल सेन्सर ड्रोन कॅमेरे आदी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. बिबट्या ज्या परिसरात असण्याची शक्यता होती त्या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला होता. तिथे चार- पाच फुटांहून अधिक उंचीचे गवत, झुडपे आहेत. तिथे वन विभागाचे अधिकारी, प्रशिक्षित वन्यजीव संरक्षक, प्राणिसंग्रहालयातील तज्ज्ञांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.

बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात 15 ते 20 ठिकाणी सापळे (पिंजरे) लावण्यात आले होते. त्यात भक्ष्यही ठेवण्यात आले होते. दरम्यान, बिबट्या पळाल्याचे वृत्त पसरल्यानंतर कात्रज व सुखसागरनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पसार झालेला बिबट्या संग्रहालयामध्येच वाढलेला आहे. त्याला खाऊ घालणारी माणसे आणि डॉक्टर यांची रोजची सवय त्याला आहे. जंगली नसल्याने तो बाहेर जाणार नाही. प्राणिसंग्रहालय पूर्णपणे बंद आणि आतून- बाहेरून सील केले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. त्याने रविवारी रात्रीनंतर काहीही खाल्लेले नाही. त्यामुळे अन्नाच्या शोधासाठी तो लपून बसलेल्या जागेतून बाहेर पडेल, तेव्हा त्याला तातडीने पकडले जाईल, असे महापालिकेने म्हटले होते.

150 सदस्यांच्या पथकाकडून शोधकार्य

पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाचे पथक, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, वन विभागाने अधिकृत मान्यता दिलेले वन्यजीव संरक्षक, प्राणिसंग्रहालयाचे अधिकारी व प्रशिक्षित गार्ड्स असे सुमारे 120 ते 150 जणांचे पथक या बिबट्याचा शोध घेत होते. इथे असलेल्या सीसीटीव्हींबरोबरच काही सीसीटीव्ही तातडीने बसविण्यात आले होते. वन्यजीव संरक्षकांकडील थर्मल सेन्सर्स व थर्मल सेन्सर्स असलेल्या ड्रोन्सची मदत घेण्यात आली, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button