रेशन दुकानांवर 4-जी ई-पॉसची सुविधा | पुढारी

रेशन दुकानांवर 4-जी ई-पॉसची सुविधा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेशन दुकानांवर आता 4-जी ई-पॉस मशिन आणि आयआरआयएस स्कॅनची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना रेशन दुकानाबाहेर ताटकळत बसावे लागणार नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्यांचा होणारा अपहार, गैरव्यवहार थांबविण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरणव्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे.

शासन निर्णयान्वये लाभार्थ्यांची ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रास्तभाव दुकानांमध्ये 2-जी, 3-जी ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या होत्या. या सेवा देणार्‍या संस्थांचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्तभाव दुकानांमध्ये नवीन ई-पॉस मशिन बसविण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार ओयासिस, व्हिजनटेक आणि इंटिग्रा या संस्थांची नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून निवड केली आहे. त्यानुषंगाने या कंपन्यांसोबत नुकताच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार केला आहे.

या वेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपसचिव नेत्रा मानकामे, अवर सचिव पूजा मानकर आदी अधिकारी उपस्थित होते. रास्तभाव दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई-पॉस मशिन 4-जी आयआरआयएस या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिधापत्रिकेमध्ये आधार संलग्न पात्र असलेली; पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना आयआरआयएस स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन केले जाणार आहे.

हेही वाचा

Back to top button