आंबेगाव तालुक्यात 1157 कोटी रुपयांची विकासकामे सुरू : अजित पवार | पुढारी

आंबेगाव तालुक्यात 1157 कोटी रुपयांची विकासकामे सुरू : अजित पवार

मंचर : पुढारी वृत्तसेवा : राज्याची तिजोरी आपल्या हातात असल्याने कुणालाही निधीची कमतरता पडणार नाही. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात तब्बल 1157 कोटी रुपयांची 653 विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झाली असून काही कामे सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येणार असून आपल्यालाही त्यांना साथ देण्यासाठी समाविचारी खासदार निवडून आणायचे आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन समारंभ झाल्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शनपर बोलत होते. या वेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार विलास लांडे, पोपटराव गावडे, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, ’भीमाशंकर’चे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पांडुरंग पवार ,स्वप्निल ढमढेरे, मंगलदास बांदल, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, मानसिक भैय्या पाचुंदकर, वसंतराव भालेराव, सुभाष मोरमारे, संजय गवारी, प्रकाश घोलप, अंकित जाधव, किरण वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, सुषमाताई शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव तालुक्यात विविध विकासकामांचा उद्घाटन व भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला असून पुढील काळातही आंबेगाव-शिरूरच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. आम्ही जे काही केले ते विकासकामांसाठी केले, बाहेर पडण्याचा निर्णय हा अजित पवार यांचा किंवा माझा नाही तर पक्षाच्या एकूण 52 आमदारांचा निर्णय होता. त्यामुळे पुढील काळात जे काही करेल ते समाजाच्या हितासाठीच करेल. आ. अतुल बेनके, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, माजी सभापती संजय गवारी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश थोरात, मयूर सरडे यांनी केले. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे पोलीस अधिकारी व अंमलदार निवासस्थान बांधकामाचे उद्घाटन, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय बांधकाम करणे, घोडेगाव बसस्थानक बांधकाम करणे, घोडेगाव येथे आदिवासी मुलींसाठी वसतिगृहचे बांधकाम करणे, आदर्श आश्रम शाळा तयार करणे इत्यादी 125 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

तीन पक्ष फिरून आलेल्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये

अजित पवार यांनी खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही टीका केली, ते म्हणाले की, तीन पक्ष फिरून आलेल्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये. मागील वेळेस वळसे पाटील व आम्ही डॉ. कोल्हे यांना खासदार म्हणून निवडून आणले. दोन वर्षांनी कोल्हे मला राजीनामा द्यायचा आहे, माझ्या कलेवर परिणाम होत आहे असे म्हणाले, त्यामुळे या पुढील काळात कलेवर परिणाम होणारी माणसे उपयोगी पडत नाहीत. त्यावेळी त्यांच्या कलेला आम्ही भुललो त्यामुळे या पुढील काळात योग्य उमेदवार निवडून देणे आपले काम आहे.

हेही वाचा

Back to top button