चक्क पुण्यातही पिकविली स्ट्रॉबेरी! पाच जातींच्या स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड | पुढारी

चक्क पुण्यातही पिकविली स्ट्रॉबेरी! पाच जातींच्या स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वरच्या थंड हवेतच नव्हे, तर आता चक्क पुण्यातही स्ट्रॉबेरीची लागवड शक्य झाली आहे. येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेतावर कृषी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची यशस्वी लागवड करून चांगले उत्पादन काढले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या प्रेरणेतून सातत्याने नवीन प्रयोग सुरू असतात. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, उद्यानविद्या प्राध्यापक डॉ. सुभाष भालेकर यांच्या देखरेखीखाली ही स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी झाली आहे. कृषी पदवीधरांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाचा अवलंब करण्यासाठी कृषीआधारित अनुभवातून शिक्षणप्रणाली राबविण्यात येत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून 20 गुंठे क्षेत्रावर दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी स्ट्रॉबेरीच्या स्वीट सेन्सेशन, बि—लियंन्स, एलिना, विंटर डॉन आणि ब्युटी अशा पाच जातींची लागवड करण्यात आली होती. लागवडीपासून ते काढणी आणि विक्री व्यवस्थापनापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली आहेत. सर्वसाधारणपणे 75 ते 80 दिवसांनी स्ट्रॉबेरीची काढणी सुरू होते आणि दीड ते दोन महिन्यांपर्यंत काढणी सुरू राहते. घाऊक बाजारात एक किलो स्ट्रॉबेरीची विक्री 150 ते 200 रुपये दराने होत असून, कृषी महाविद्यालयातील स्ट्रॉबेरीचा दर किलोला 200 रुपये आहे.

महाविद्यालयाला रोजचे मिळतात 12 ते 15 हजार रुपये

जानेवारी महिन्यापासून या स्ट्रॉबेरीची काढणी सुरू झाली आहे. प्रतिझाड सरासरी 350 ते 450 ग्रॅम एवढे उत्पन्न मिळत असून, प्रत्येक झाडाला जवळपास 11 ते 17 फळे लागली आहेत. फळांचे सरासरी वजन 25 ते 30 ग्रॅम इतके आहे. एका फळाचे 81 ग्रॅम इतके सर्वात जास्त वजन स्वीट सेन्सेशन या जातीचे दिसून आले आहे. दररोज जवळपास 40 ते 50 किलो स्ट्रॉबेरीची काढणी केली जाते, त्यातून महाविद्यालयास बारा ते पंधरा हजार रुपये दररोज मिळतात.

हेही वाचा

Back to top button