कांद्याच्या अल्पदराने शेतकर्‍याच्या डोळ्यांत पाणी : उत्पादन खर्चही निघेना | पुढारी

कांद्याच्या अल्पदराने शेतकर्‍याच्या डोळ्यांत पाणी : उत्पादन खर्चही निघेना

मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : मोरगावजवळील 54 वस्ती येथील शेतकरी हनुमंत तावरे यांच्या शेतातील कांद्याला अत्यल्प भाव मिळाला. यामध्ये उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांद्यामुळे त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. तावरे यांनी दीड एकरात कांदा लागवड केली. त्यासाठी 15 हजार रुपयांची रोपे आणली. लागवडीसाठी दहा हजारांचा खर्च केला. खुरपणी आणि खतांसाठी प्रत्येकी दहा हजार आणि औषध फवारणी आणि काढणीसाठी प्रत्येकी पाच हजार, असा एकूण 55 हजारांचा खर्च केला. या वर्षी कांद्याला समाधानकारक पाणी मिळाले नाही. त्यामुळे त्यांना 20 क्विंटल इतकेच कांदा उत्पादन निघाले.

सध्या कांद्याला क्विंटलला 1500 रुपयांप्रमाणे दर मिळत असल्याने यंदा नुकसान सहन करावे लागले. तसेच मशागतीच्या खर्चापेक्षाही उत्पन्न अत्यल्प आल्याने कौटुंबिक खर्चाची ओढाताण होत आहे. शासनाने कांदा पिकाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी हनुमंत तावरे यांनी केली आहे. दरम्यान, या वर्षी मोरगाव येथे 30 हेक्टर व तरडोलीत 20 हेक्टर क्षेत्रावर रब्बी कांद्याची लागवड झाली आहे. मात्र, यंदाच्या कमी पर्जन्यमानामुळे कांदा पिकाला पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे उत्पादनात घट येत असल्याची माहिती कृषी सहायक प्रसाद तावरे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button