राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही? : आदित्य ठाकरे यांचा सवाल | पुढारी

राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही? : आदित्य ठाकरे यांचा सवाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत आहे. पोलिसदेखील कारवाई करत आहेत. मात्र, राजकारणी लोकांचे गुंडांसोबतचे फोटो समोर येत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली.
एका कार्यक्रमानिमित्त रविवारी (दि.25) पुण्यात आलेल्या ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी चुकीची कामे सुरू आहेत. या चुकीच्या कामांना सरकार दुजोरा देत असल्याचे दिसत आहे. हे सरकार कंत्राटदारांचे आहे की सर्वसामान्यांचे आहे, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. ठाकरे म्हणाले, या सरकारच्या काळात राज्याची विकासाची घडी बिघडली आहे. अनेक कामे तयार होऊनही उद्घाटन न केल्यामुळे सामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाहीत. पुण्यातील मेट्रो आणि विमानतळाचे काम झाले आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना उद्घाटन करायला वेळ नाही. या सरकारने दोन वर्षांत दोन कृषिमंत्री बदलले. परंतु, दोघांपैकी कोणीही शेतकर्‍यांच्या बांधावर गेले नाहीत. दोन वर्षांपासून शेतकर्‍यांना पीकविमा मिळालेला नाही. यामुळे शेतकरी वार्‍यावर पडला आहे. या सरकारची भूमिका नेमकी काय आहे, हे यावरून सिद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.

अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करतात

राज्याचे मुख्यमंत्री अमावस्या आणि पौर्णिमेला शेती करायला जातात, हे त्यांच्या आजवरच्या दौर्‍यावरून दिसून येते. त्यामुळे काम होऊन केवळ उद्घाटन न केल्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी झालेल्या कामाचे उद्घाटन करून नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका करावी, असेही ठाकरे यांनी सांगितले.

जनरल डायर कोण, हे समजायला पाहिजे

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. याप्रकरणी अधिकार्‍यांची बदली झाली. परंतु, अशा मोठ्या आंदोलनात आदेश आल्याशिवाय पोलिस लाठीचार्ज करत नाहीत. असा आदेश देणारा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी जनरल डायर कोण, हे समजायला पाहिजे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button