मतदानाचा टक्का वाढणार : जिल्हा प्रशासनाने कसली कंबर | पुढारी

मतदानाचा टक्का वाढणार : जिल्हा प्रशासनाने कसली कंबर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील चार विधानसभा मतदारसंघात मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी राहिला होता. हा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृतीसह तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले आहे. याशिवाय थेट सोसायटीमध्ये देखील मतदान केंद्राची व्यवस्था येत्या निवडणुकीत करण्यात येणार आहे. परिणामी, मतदानाचा टक्का वाढण्याचा विश्वास प्रशासन व्यक्त करत असून, त्याचबरोबर मतदान टक्का कमी झाल्याच्या कारणांचा देखील स्थानिक पातळीवर अभ्यास करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

मतदान करण्यास नागरिक बाहेर पडल्यानंतर, मतदान केंद्रावर मोठी रांग पाहून मागे फिरण्याचे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी नागरिकांना घर बसल्या मोबाईल अ‍ॅपवर त्यांच्या मतदान केंद्रावरील प्रत्यक्ष स्थिती समजणार आहे. याशिवाय तुम्हाला तुमचा उमेदवार निवडण्यासाठी त्याची शैक्षणिकसह इतर माहिती देखील मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. तसेच, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रावर बाळाला घेऊन मतदान करण्यास आलेल्या बाळाला सांभाळण्याची व्यवस्था देखील उभारली जाणार आहे, त्यासाठी अंगणवाडीसेविकेकडे जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी, विविध स्पर्धा, पथनाट्ये यांचा आधार घेऊन मतदारांनी मतदान करण्यास बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात एकच मतदान केंद्र सुमारे 1,548 ठिकाणी आहेत. एकूण मतदान केंद्रांपैकी सुमारे 497 ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत. त्यात पुणे मतदारसंघात सर्वाधिक पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत. पुण्यात सर्वाधिक 186 तर बारामतीमध्ये 82, मावळमध्ये 103 आणि शिरूरमध्ये 126 एवढी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे आहेत. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूरमध्ये एका ठिकाणी 24 मतदान केंद्रे आहेत.

मतदानाचा टक्का कमी असलेल्या मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. जनजागृतीवर अधिक भर दिला असून, त्याला तंत्रज्ञानाची देखील जोड दिली आहे. मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवू नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

– मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

हेही वाचा

Back to top button