

दोहा; वृत्तसंस्था : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे इमीर ऑफ कतार शेख तमिम बिन हमद अली थानी यांच्यात उभय देशांतील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाली.
फाशीची शिक्षा झालेल्या भारताच्या 8 माजी नौदल अधिकार्यांची सुटका केल्याबद्दल मोदी यांनी थानी यांचे विशेष आभार मानले. संयुक्त अरब अमिरातीमधील हिंदू मंदिराच्या उद्घाटनंतर मोदी कतार दौर्यावर गेले. त्यांच्यासमेवत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. याठिकाणी मोदी यांचे शाही स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोदी आणि थानी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. उभय देशांतील व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, वित्त आदी क्षेत्रांतील गुंतवणूक करण्याच्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. दोन्ही देशांतील मैत्री नव्या उंचीवर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णयही या बैठकीत झाला.
सन 2016 मध्ये मोदी यांनी याआधी कतारला भेट दिली होती. कतारचा मोदी यांचा हा दुसरा दौरा आहे. कतारच्या न्यायालयाकडून हेरगिरी प्रकरणात आठ माजी भारतीय नौदल अधिकार्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताच्या राजनैतिक स्तरावरील पाठपुराव्यानंतर या अधिकार्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर या आठवड्यात त्यांची सुटका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी कतारचा दौरा केल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारमधील सहपदस्थांसमवेत शाही भोजनाचा आस्वाद घेतला. तत्पूर्वी, कतारमधील भारतीयांशीही त्यांनी संवाद साधला. यावेळी मोदी यांना तिरंगा ध्वज भेट देण्यात आला. मोदी यांच्या नावासह भारतमाता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. भारतीयांमध्ये मुस्लिम बोहरा समुदायाचाही समावेश होता. या समुदायानेही मोदी यांचे स्वागत केले. अनिवासी भारतीयांच्या आदरातिथ्याने भारावलेल्या मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून आभार मानले.