सातारा : अजनुजमध्ये लेकाला वाचवताना पिताही बुडाला | पुढारी

सातारा : अजनुजमध्ये लेकाला वाचवताना पिताही बुडाला

खंडाळा; पुढारी वृत्तसेवा : अजनुज (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत गोधडी, कपडे धुण्यास गेलेले बाप-लेक धोम बलकवडी कालव्यातून वाहून गेले. पाच वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी कालव्यात उडी मारली; मात्र तेही वाहून गेले. दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर चिमुरड्याचा मृतदेह सापडला. मात्र, त्याच्या वडिलांचा शोध लागला नाही. या हृदयद्रावक घटनेमुळे गावासह खंडाळा तालुका गलबलून गेला आहे.

शंभुराज विक्रम पवार (वय 5) असे मृत्यू झालेल्या मुलाचे, तर विक्रम मधुकर पवार (32, रा. अजनुज) असे बेपत्ता असलेल्या वडिलांचे नाव आहे. पवार कुटुंबीय रविवारी दुपारी धोम बलकवडी कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते. गोधडी धुवत असताना चिमुरडा शंभुराज हा कालव्यातील एका उतारावरून घसरून थेट पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे गेला. मुलगा वाहत जात असल्याचे पाहून वडील विक्रम यांनीही कालव्यात उडी मारली. मात्र, त्यांना व्यवस्थित पोहता येत नसल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. नातू वाहून गेल्यानंतर मुलगाही वाहत असल्याने शंभुराज याचे आजोबा मधुकर पवार यांनी त्यांच्या बचावासाठी कालव्यात उडी मारली. मात्र तेही जोरदार प्रवाहाबरोबर वाहून जावू लागल्याने महिलांनी साडीच्या सहाय्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढले.

या घटनेत विक्रम व शंभूराज हे दोघे बाप-लेक वाहून गेले. ही घटना घडल्यानंतर कालव्यावर असणार्‍या महिलांनी आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या शोधासाठी नागरिकांनी तब्बल दोन किमीचा परिसर शोधला. दीड किमीच्या अंतरात नागरिकांना शंभूराज सापडला. यानंतर त्याला तत्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शंभूराज याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दुसरीकडे शंभूराज याचे वडील विक्रम यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मात्र, ते कोठेही आढळून आले नाहीत. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार अजित पाटील, पोलीस निरिक्षक सुनिल शेळके, नायब तहसिलदार योगेश चंदनशिवे, मंडलाधिकारी संतोष नाबर यांनी भेट दिली. खंडाळा, शिरवळ रेस्क्यू टिम व परिसरातील ग्रामस्थांनी शोध कार्यात मदत केली. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे .

Back to top button