सोशल मीडियाच्या ओळखीतून बलात्कार; तरुणीचा गर्भपात करणार्‍या डॉक्टरवर गुन्हा दाखल | पुढारी

सोशल मीडियाच्या ओळखीतून बलात्कार; तरुणीचा गर्भपात करणार्‍या डॉक्टरवर गुन्हा दाखल

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केल्यानंतर तरुणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण केले. त्यातून संबंधित तरुणी गर्भवती राहिल्याने तरुणीचा बेकायदेशीर गर्भपात डॉक्टरांकडून केल्याने पोलिसांनी आरोपी तरुणाच्या नातेवाइकांसह डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने आरोपींविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निरंजन बाजीराव घुले, त्याचे वडील बाजीराव घुले, त्याची आई, त्याचे दाजी मल्हार कुंजीर, त्याचा मित्र समीर चौधरी, डॉ. टी. वाय. मोटे व डॉ. राजेश्री मोटे व अनोळखी दोन व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार मार्च 2022 ते आत्तापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या 22 वर्षीय तरुणीची आरोपी निरंजन घुलेशी सोशल मीडियावर ओळख झाली. निरंजन याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आमिष दाखवले. तरुणी आंघोळ करत असताना लपून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यातून तरुणी गर्भवती राहिली. हा प्रकार निरंजनच्या नातेवाइकांना समजला. त्यांनी तरुणीला गर्भपात कर नाहीतर, तुला मारून उजनीच्या धरणात फेकून देऊ, अशी धमकी दिली. तरुणीला माहेर हॉस्पिटल, उरळीकांचन येथे नेऊन तिचा बेकायदेशीर गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबतचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे करत आहे.

हेही वाचा

Back to top button