नाशिक : पुढारी वृत्तसेवा
९५.७५ कोटींच्या थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने शहरातील ४४ हजार ३८५ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या असून, आठ दिवसांत थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा दिला आहे. या थकबाकीदारांची यादीही महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जात आहे.
दि. १ एप्रिल २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान घरपट्टीतून १६६ कोटींचा महसूल वसूल करण्यात महापालिकेच्या कर विभागाला यश आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत घरपट्टी वसुलीत सुमारे १८ कोटींची वाढ झाली आहे. मात्र पाणीपट्टी वसुलीत अपेक्षित यश मनपाच्या पदरी पडलेले नाही. पाणीपट्टीच्या देयकांचे वाटपही मुदतीत झाले नसल्याने गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत जेमतेम ३८ कोटींची पाणीपट्टी वसूल झाली आहे. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीत सुमारे तीन कोटींची घट झाली आहे. ही बाब आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी गांभीर्याने घेतली असून, पाणीपट्टीच्या थकबाकीदारांविरोधातील कारवाई तीव्र करण्याचे आदेश कर व पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. विशेषत: थकबाकीदारांविरोधात कारवाईची जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर सोपविली आहे.
शहरात एकूण दोन लाख सात हजार नळजोडणीधारक आहेत. त्यापैकी ४४ हजार ३८५ नळ जोडणीधारकांकडे ९५.७५ कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. वारंवार सूचनापत्रे देऊनही ही थकबाकी वसूल होत नसल्याने करवसुली विभागाने या थकबाकीदारांची यादी पुढील कारवाईसाठी पाणीपुरवठा विभागाकडे सोपविली आहे. संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, सात दिवसांत थकबाकीची रक्कम न भरल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाणीपट्टीचे विभागनिहाय थकबाकीदार व थकबाकीची रक्कम
विभाग थकबाकीदारांची संख्या थकबाकीची रक्कम (कोटींत)
सातपूर ७,४८६ १४.६७
पंचवटी १२,१४४ २३.७५
सिडको ७,७१३ १४.६४
नाशिकरोड ६,९०४ १७.३५
नाशिक पश्चिम १,६२० ६.९०
नाशिक पूर्व ८,५१८ १८.४२
एकूण ४४,३८५ ९५.७५
पाणीपट्टी वसुलीसाठी ४४,३८५ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. येत्या सात दिवसांत थकबाकीची रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून या थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित केल्या जातील. – श्रीकांत पवार, उपायुक्त (कर), मनपा.