Parbhani News: लवकरात लवकर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करा- गावकऱ्यांची मागणी | पुढारी

Parbhani News: लवकरात लवकर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करा- गावकऱ्यांची मागणी

ताडकळस; पुढारी प्रतिनिधी: पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताडकळस गावाची लोकसंख्या 15 हजारच्या घरात आहे. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवाशांची संख्या दिवसागणिक हजारांच्यावर असताना परभणी आगाराच्या वतीने केवळ परभणी ताडकळस पालम बसद्वारेच सेवा देण्यात येते. परिणामी प्रवाशांना खासगी वाहनाचा सहारा घेऊन प्रवास करावा लागतो. या अडचणी लक्षात घेत, लांबच्या पल्याच्या बस सुरू करण्याच्या गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

ताडकळस हे परभणी पालम व सिंगनापूर पूर्णा या राज्य महामार्गावर 15 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. येथे २ राष्ट्रीयकृत बॅंका, सहकारी बँका , पतसंस्था,शाळा, महाविद्यालय,पोलीस ठाणे, रूग्णालये व बाजार समिती,जल संपदा विभागाचे कार्यलय असल्याने येथे नेहमी ४०/45 आजुबाजुच्या खेडे गावातील लोकांचा दररोज संपर्क असतो. येथुन जाणाऱ्या राज्य महामार्गचे रूंदीकरण व डांबरीकरण झाल्याने येथुन नांदेड, संभाजी नगर, पुणे, बीड, पाथरी, माजलगाव, परळी , अंबाजोगाई आदी गावाला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा चालू आहे.

बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी कॉलेज नसल्याने विद्यार्थ्यांचे कॉलेजसाठी नांदेड, लातूर, अहमदपूर येथे नेहमी ये-जा चालू असते. तसेच व्यापारी वर्गाची नांदेड, उदगीर, लातूर, कंधार, अंबाजोगाई आदी ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी बसेस नसल्याने खासगी वाहनांचा वापर करावा लागतो, यामुळे वेळ तसेच आर्थिक चे नुकसान होते. त्यामुळे लवकरात लवकर लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लांब पल्याच्या बस साठी १९९५ पासून चा लढा

लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करा या मागणी साठी ताडकळस येथील दि 5 /11/95कै, जेष्ट पञकार तुकाराम नाईकवाडे यांच्या पुढाकाराने तत्कालीन सरपंच बाबासाहेब साखरे, कळगावचे तक्तालीन सरपंच कै,बाबुराव देवकते,माजी सभापती रंगनाथ भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य कै, धोंडिबाराव होणमने, रामकिशन मुरकुदे, रामपाल मुंदडा, माजी ग्रामपंचायत सदस्य शेख ईनाततुला , चेअरमन गोपाळराव आंबोरे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर आंबोरे, ग्रामपंचायत सदस्य /पञकार मदनराव आंबोरे, माणिक लाकडे, बालासाहेब कापसे,यांच्या सह ग्रामस्थ आमरण उपोषण करण्यात आले, यावेळी एसटी महामंडळाने नांदेड, कंधार, गंगाखेड बसेस चालू करण्यात आल्या होत्या, परंतु रस्ता खराब कारण सांगून सर्व बंद करण्यात आल्या. आता रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरण झाले असून आता तरी लांब प्रचार चालू करण्याची मागणी होत आहे.

 पुणे येथे जाण्यासाठी बसेस ची गरज

ताडकळस व पूर्णा तालुक्यातील बरेचशे कामगार वर्ग व विद्यार्थी पुणे येथे आहेत, ते नेहमी गावाकडे ये जा करत असतात, रेल्वे चे आरक्षण व सामान्य डब्यात जागा मिळणे कठीण आहे. तर पुणे येथे जाण्यासाठी ३ खासगी ट्रॅव्हल्स नांदेड ते पुणे सुरू झाल्या आहेत परंतु विद्यार्थीना त्याचे दर परवडणारे नसल्याने पूर्णा येथुन पुणे जाण्यासाठी बस चालू करण्याची मागणी होत आहे.
प्रवाशांची मागणी वाढत असल्याने परभणी ताडकळस पालम या गाडीच्या चार फेऱ्या वाढवण्यात आल्या तरीही प्रवाशांना जागा मिळणे कठीण झाले असून त्या गाड्यांची गर्दी पाहता लांबल्याच्या बस सोडण्याची ताडकळस व परीसरातील प्रवास्यातुन मागणी होत आहे

Back to top button