ब्रिटनमध्ये १९०० वर्षांपूर्वी झाला होता ढेकणांचा सुळसुळाट! | पुढारी

ब्रिटनमध्ये १९०० वर्षांपूर्वी झाला होता ढेकणांचा सुळसुळाट!

लंडन : ढेकणांचा उच्छाद ही काही विकसनशील देशांमधीलच समस्या आहे असे नाही. सध्याही युरोपमधील अनेक देशांमध्ये उंदीर, झुरळ व ढेकणांचा सुळसुळाट झालेला आहे. ब्रिटनमध्ये तर ही पीडा किमान १९०० वर्षांपासून आहे असे एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे. इंग्लंडच्या हॅड्रियन्स वॉलच्या दक्षिणेकडे असलेल्या एका रोमन काळातील किल्ल्यामधील संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. हा किल्ला ‘विंडोलँडा’ या नावाने ओळखला जातो.

युनिव्हर्सिटी कॉलेज डबलिनमधील केटी वायसे जॅकसन या पुरातत्त्व विषयाच्या विद्यार्थिनीने याबाबतचे संशोधन केले आहे. या किल्ल्यात कीटकांचे काही प्राचीन अवशेष आढळून आल्यावर तिने याबाबतचे सखोल संशोधन केले. तिला ‘विंडोलँडा’ च्या सर्वात खालच्या स्तरांमध्ये ढेकणांचे अवशेष सापडले.

इसवी सन 43 मध्ये रोमन सैनिकांनी ब्रिटनवर आक्रमण केले होते. त्यांनीच ब्रिटनमध्ये ढेकणं आणली असा एक प्रवाद आहे. तो या संशोधनामुळे खरा ठरत आहे. इंग्लंडच्या अन्यही अनेक ठिकाणी जुन्या काळातील ढेकणांचे पुरावे सापडलेले आहेत. त्यामध्ये वार्विकशायरमधील रोमन वसाहतीचाही समावेश आहे. ही वसाहत दुसर्‍या शतकाच्या अखेरच्या काळापर्यंत होती.

Back to top button