नगर रोड रस्त्यावर दुभाजकांचा अभाव; अपघाताचा धोका | पुढारी

नगर रोड रस्त्यावर दुभाजकांचा अभाव; अपघाताचा धोका

माऊली शिंदे

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने काही दिवसांपूर्वी नगर रोडवरील बीआरटी मार्ग काढला आहे. त्यानंतर रस्त्यामध्ये तात्पुरते
दुभाजक लावले आहे. परंतु, काही ठिकाणी अद्याप दुभाजक लावले नसल्याने वाहने अचानक रस्त्याच्या मधून वळवली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी बीआरटी काढण्याची मागणी केली होती. तसेच, मेट्रोच्या कामामुळे ’बीआरटी’ची सेवा विस्कळीत झाली होती.

त्यामुळे महापालिकेने येरवडा ते विमाननगर दरम्यानची बीआरटी मार्ग व दुभाजक काढले आहेत. त्यानंतर या ठिकाणी तात्पुरते दुभाजक तयार केले आहे. तसेच काही ठिकाणी रस्ता दुभाजकांचे काम पूर्ण करण्यात आले नाही. या ठिकाणांवरून वाहने वळण घेतात. रामवाडी पोलिस चौकी येथे बीआरटी बसथांब्याजवळ रस्ता दुभाजक नसल्याने रस्त्याच्या मधून वाहने वळवली जात आहेत. तसेच नगररोड वरील आयबीआयएस हॉटेल समोर रस्ता दुभाजक केला नाही. यामुळे अशा ठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकेने बीआरटी मार्ग काढण्याची घाई केली. परंतु, त्यानंतर आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. हा मार्ग काढल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. त्यातच रस्त्यावर रस्ता दुभाजक नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

– राहुल चव्हाण, रहिवासी

नगर रस्त्यावर रस्ता दुभाजकाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी काम राहिले आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना
दिल्या जातील.

-उपेंद्र वैद्य, अधिकारी, पथ विभाग, महापालिका

हेही वाचा

Back to top button