फितुरांचा महाराष्ट्राला प्रचंड राग, द्वेष : जयंत पाटील | पुढारी

फितुरांचा महाराष्ट्राला प्रचंड राग, द्वेष : जयंत पाटील

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : आद्यक्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांना फितुरीने पकडले आणि त्यांना फाशी दिली गेली. इतिहासात फितुरीमुळे मराठ्यांच्या राज्याला धक्के बसले आहेत. फितुरीच्या बाबतीत महाराष्ट्राला प्रचंड राग व द्वेष आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील माणसे दहावेळा विचार करतात इतिहासापासून सगळ्यांनी धडे घ्यायचे असतात. इतिहास समोर ठेवून भविष्याकडे बघायचे असते, जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्यदेखील पराभूत होते, नामशेष होते,असे विचार जेजुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाच्या वतीने आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या 192 व्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन व सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी गडावर जाऊन उमाजी नाईक यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आद्यक्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांच्या काळात लेखन करण्यासाठी लेखक नव्हते, कथाकार नव्हते त्यांचा इतिहास ब्रिटिश अधिकार्‍यांनी लिहिला. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी पहिले बंड केले म्हणून ते आद्यक्रांतिकारक आहेत.

राज्याची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. पोलिस स्टेशनमध्ये भाजपचे आमदार गोळीबार करतात. ही गुंडशाही आहे. जर सत्तेतील आमदाराच गोळीबार करीत असतील, तर जनतेची सुरक्षा कशी राहील, असा प्रश्न जयंत पाटील यांनी व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, उमाजी राजे नाईक यांच्या बलिदानदिनानिमित्त आजपासून सर्व रामोशी समाज बांधव, वंचित भटके समाजाचे प्रश्न आपण पुढाकार घेऊन सोडविणार आहे. नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी आद्यक्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी केली. या कार्यक्रमावेळी महानंदा दूधचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामआप्पा इंगळे,दतात्रय चव्हाण,हेमंतकुमार माहुरकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, कात्रज दूध संघाचे संचालक तानाजी जगताप,नगरसेवक जयदीप बारभाई आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button