US Air Strike | अमेरिकेकडून इराक, सिरीयातील ८५ ठिकाणांना लक्ष्य, ४० दहशतवादी ठार | पुढारी

US Air Strike | अमेरिकेकडून इराक, सिरीयातील ८५ ठिकाणांना लक्ष्य, ४० दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेने इराक सिरीयातील ८५ ठिकाणांना लक्ष्य करत हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या सैन्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये इराण-इराकमधील ४० दहशतवादी ठार झाले आहेत. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. अमेरिकेने इराक आणि सीरियामध्ये हवाई हल्ले सुरू केले असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. (US Air Strike)

अमेरिकेने शुक्रवारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड (IRGC) आणि त्याच्या नागरी सेनेशी संबंधित इराक आणि सीरियामधील ८५ हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात सीरियातील ४० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यात जॉर्डनमधील ड्रोन हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेने ही कारवाई केली. जॉर्डनमधील ड्रोन हल्ल्यात ३ अमेरिकन सैनिक मारले गेले होते. (US Air Strike)

अमेरिकन सैन्याने मोठा हल्ला केला. यात कमांड आणि कंट्रोल मुख्यालय, गुप्तचर केंद्रे, रॉकेट आणि क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि दारूगोळा स्टोरेज साइट्स आणि दहशतवाद्यांशी संबंधित इतर सुविधांना लक्ष्य करण्यात आले. हे हल्ले सुरू केल्यानंतर “तुम्ही एखाद्या अमेरिकन नागरिकाला हानी पोहोचवली तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ.” असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला आहे.

बायडेन यांच्या प्रशासनाच्या पहिल्या मोठ्या लष्करी कारवाईत अमेरिकन सैन्याने दहशतवाद्यांच्या सात ठिकाणांना लक्ष्य केले. यात सीरियातील ४ आणि इराकमधील ३ ठिकाणांचा समावेश आहे. ब्रिटन स्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सच्या म्हणण्यानुसार, लांब पल्ल्याच्या बी-१ बॉम्बरचा वापर असलेल्या या हल्ल्यांमध्ये सीरियामधील ४० इराण समर्थक दहशतवादी मारले गेले.

राष्ट्राध्यक्ष ‘ज्यो बायडेन’ यांचा इशारा

राष्ट्राध्यक्ष ‘ज्यो बायडेन’ यांनी सांगितले की जर एखाद्या अमेरिकन नागरिकाचे नुकसान झाले तर अमेरिका त्याला जोरदार “प्रत्युत्तर देईल”. जॉर्डन हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेची प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरु राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “आमची प्रत्युत्तरादाखल कारवाई आजपासून सुरू झाली. आम्ही ठरवलेल्या ठिकाणी ही कारवाई सुरू राहील. अमेरिकेला मध्य पूर्व अथवा जगात कोठेही संघर्षाची परिस्थिती नको आहे. परंतु जे आमचे नुकसान करू इच्छितात त्यांना हे कळू द्या. जर तुम्ही एखाद्या अमेरिकनला हानी पोहोचवाल, आम्ही प्रत्युत्तर देऊ,” असा इशारा बायडेन यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button