Minister Chandrakant Patil : खेळाकडे करिअरचा मार्ग म्हणून पाहा : मंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

Minister Chandrakant Patil : खेळाकडे करिअरचा मार्ग म्हणून पाहा : मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : खेळाकडे करिअर म्हणून बघा, त्याद़ृष्टीनेच यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी ‘पुढारी राईज अप’ महिला क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना दिला. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसर्‍या दिवशी पाटील यांच्या हस्ते शंभर मीटर धावणे प्रकाराचा शुभारंभ झाला. (Minister Chandrakant Patil)

दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित ‘पुढारी राईज अप’ महिला क्रीडा स्पर्धा अ‍ॅथलेटिक्स-24 स्पर्धेचा शनिवारी दुसरा दिवस होता. 9 ते 19 वर्षांखालील मुलींसाठी आयोजित या स्पर्धेत दुसर्‍या दिवशीही रंगत होती. (Minister Chandrakant Patil)

स्पर्धेचे प्रमुख पाहुणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, केवळ हौस म्हणून खेळाकडे पाहू नका. अन्य करिअर प्रमाणेच खेळात सुद्धा चांगले करिअर करता येते. यामुळे खेळाकडे करिअर म्हणूनच बघा. यापूर्वी सायंकाळी खेळण्यासाठी जाताना पालकही मुलांना खेळायला जाऊ देत नव्हते, पण आता परिस्थिती बदलली आहे. खेळ ही एक प्रकारची गुंतवणूक म्हणूनच पालक त्याकडे पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळासाठी पोषक वातावरण तयार केल्याचे सांगत पाटील म्हणाले, आजही खेळाडू परदेशात खेळण्यासाठी जातात, त्यावेळीही पंतप्रधान त्याकडे लक्ष ठेवून असतात. अगदी पराभूत झालेल्यांनाही बोलावून धीर देत, पुढील वेळेसाठी चांगली तयारी करायला प्रोत्साहन देत आहेत. केंद्र व राज्य शासनही खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत. चांगली बक्षिसे देत आहेत. पाच टक्के नोकरीत आरक्षण दिले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कास्यपदक विजेत्यालाही वर्ग 1 ची नोकरी दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरला खेळाची मोठी परंपरा आहे, असे सांगत पाटील म्हणाले, कोल्हापूर म्हणजे कुस्ती असे म्हटले जात होते. मात्र, सध्या नेमबाजी, फुटबॉल, क्रिकेट अशा सर्वच खेळात कोल्हापूरचे खेळाडू नाव गाजवत आहेत. वर्तमानपत्र म्हणून असे उपक्रम राबविणे हे माध्यमांचे काम नाही. मात्र, जी जी गोष्ट समाजाच्या उपयोगी पडेल, ती ती प्रत्येक गोष्ट केली पाहिजे, ही भूमिका दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांची आहे. त्यातून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

खेळाडूंशी साधला संवाद

या स्पर्धेत वय वर्षे नऊ ते 19 वर्षांखालील मुली, युवती सहभागी झाल्या आहेत. मंत्री पाटील यांनी स्पर्धेतील सहभागी एका दहा वर्षीय खेळाडूशी संवाद साधला. कोठून आली आहे, कशी आली आहे, कोणकोण सोबत आहेत, किती अंतर धावणार आहेस आदी प्रश्न पाटील यांनी विचारले. त्यावर ती देत असलेल्या उत्तराने पाटील यांच्या चेहर्‍यावर कुतूहलाचे भाव दिसत होते. त्या मुलीशी हस्तांदोलन करत त्यांनी उपस्थित सर्वच महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. (Minister Chandrakant Patil)

सिंथेटिक ट्रॅक सरावासाठी मिळणार

यावेळी पाटील यांनी पुण्यानंतर कोल्हापुरातच सिंथेटिक ट्रॅक असल्याचे सांगितले. यावेळी सातारा जिल्ह्यातील एका राष्ट्रीय शालेय खेळाडूने शालेय विद्यार्थ्यांसाठी सरावासाठी सिंथेटिक ट्रॅक या तीन जिल्ह्यांत उपलब्ध नसल्याचे सांगितले. दरम्यान, कुलसचिव डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाच्या ‘मिशन ऑलिम्पिक’ योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठीही हा ट्रॅक सरावासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button