Maratha Reservation : जिल्ह्यातील शंभर टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण | पुढारी

Maratha Reservation : जिल्ह्यातील शंभर टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण

नगर : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी जिल्हाभरात गेले अकरा दिवस सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरु होते. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत दहा तालुक्यांतील सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाले. अहमदनगर महापालिकेसह ग्रामीण भागात सर्वेक्षण शंभर टक्के झाल्याचे सांगण्यात येत आहे. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्वेक्षण गुरुवारीच शंभर टक्के पूर्ण झाले आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासूनच मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु झाले होते. सर्वेक्षणासाठी जवळपास अकरा हजार प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रगणकांनी गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र इन्स्टिट्यूटच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे घरोघरी जाऊन माहिती गोळा केली. पहिले दोन तीन दिवस सर्व्हर जॅम होत असल्यामुळे सर्वेक्षणास वारंवार अडथळे निर्माण होत होते. तीन दिवसांपूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाने अ‍ॅप नव्याने अपडेट केला. त्यामुळे सर्वेक्षणास गती मिळाली. शंभर टक्के सर्वेक्षणासाठी आयोगाने दोन दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रगणकांचे सर्वेक्षण कामकाज सुरुच होते. भिंगार कॅन्टोन्मेंटमध्ये एकूण 2 हजार 701 कुटुंब आहेत. या सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण गुरुवारीच पूर्ण झाले आहे.

मनपाचे सर्वेक्षण 100 टक्के पूर्ण

महापालिकेच्या हद्दीत खासगी शिक्षक व मनपा कर्मचारी, असे 900 जण सर्वेक्षणाचे काम करीत होते. 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत महापालिका हद्दीत शंभर टक्के सर्वेक्षण झाले. सुमारे 74 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, रात्री 12 पर्यंत डाटा वेबसाईटवर डाटा अपलोड करण्याची मुदत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत महापालिका कर्मचारी, प्रगणक डाटा अपलोड करीत आहेत, अशी माहिती महापालिकेचे आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे यांनी दिली.

चार तालुक्यांच्या प्रमाणपत्रांची प्रतीक्षा

शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे अकोले, कोपरगाव, शेवगाव, कर्जत, राहाता, पारनेर, श्रीरामपूर, पाथर्डी, राहुरी व जामखेड या दहा तालुक्यांतील तहसीलदारांनी सर्वेक्षण शंभर टक्के झाल्याचे प्रमाणपत्र पाठविले आहे. मात्र, अहमदनगर, नेवासा, श्रीगोंदा व संगमनेर या चार तालुक्यांचे प्रमाणपत्र रात्री 9 वाजेपर्यंत उपलब्ध झाले नव्हते.

हेही वाचा

Back to top button