जळगाव दूध फेडरेशनमध्ये नोकरीच्या आमिषाने तरुणाला साडेतेरा लाखांचा गंडा | पुढारी

जळगाव दूध फेडरेशनमध्ये नोकरीच्या आमिषाने तरुणाला साडेतेरा लाखांचा गंडा

जळगांव- पुढारी वृत्तसेवा; जळगाव येथील एका व्यक्तीने कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागात सहाय्यक व्यवस्थापक पदावर असल्याचे सांगून एका तरुणाला जळगाव दूध फेडरेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेतेरा लाख रुपयांना गंडा घातला आहे.  याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यलयात सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून एका तरुणाला जळगाव दूध फेडरेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी तरुणाकडून साडेतेरा लाख रुपये घेण्यात आले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथे राहणारा फकीरा अर्जुन सावकारे (25) याचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तसेच फिटर कोर्स झाला आहे. नोकरीच्या शोधात असताना जळगाव येथील प्रमोद शांताराम सावदेकर या व्यक्तीशी त्याची ओळख झाली. आपली राजकीय लोकांशी ओळख असून कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभाग कार्यालय जळगाव येथे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर काम करीत असल्याचे  सांगितले. तुझे नोकरीचे काम करून देऊ शकतो असे आमिष दाखवले.

जळगाव दुध फेडरेशनमध्ये टेक्निशियन फिटर या पदावर नोकरीला लावून देतो असे आमिष दाखविले. नोकरी लावण्यासाठी फकीरा सावकारे याला पाच लाख रुपये मागितले व ते त्याने त्याचा मित्र शेख जावेद शेख रहीम याच्या समोर 5 ऑगस्ट 2021 रोजी दिले. दुध फेडरेशन जळगाव येथे जागा निघाल्या असुन तेथे फॉर्म भरुन दे, मी पेपरचे पाहुन घेईल, असे फकीरा यांना सांगितले. पेपर दिला व परीक्षेत पास झाला. यानंतर कन्फर्म ऑर्डर काढण्यासाठी आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर सावदेकर यांना पुन्हा  १२ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव येथे ५ लाख दिले. तुझी मुलाखत व कागदपत्रे पडताळणी होईल. त्यासाठी तुला परत साडेतीन लाख द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर मार्च २०२२ या महीन्यात त्यांना पुन्हा साडेतीन लाख दिलेत. परंतू पैसे घेऊन ऑर्डरसाठी फकीरा यांनी विचारणा केली असता सावदेकर यांनी उडवा उडवीचे उत्तरे द्यायला लागले. फकिरा सावकारे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. प्रमोद सावदेकर यांनी त्यांचे राजकीय हिससंबंध चांगले असल्याचा विश्वास देत आपली १३ लाख ५० हजार रोख घेवुन नोकरी न लावता फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात भादवी ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button