Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न; मुख्यमंत्री म्हणाले,”अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब” | पुढारी

Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न; मुख्यमंत्री म्हणाले,"अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब"

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांच्यासोबतचे फोटो शेअर करत त्यांचे अभिनंदन केले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट करत अभिनंदन करत प्रणाम केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”पितृतुल्य व्यक्तिमत्त्व लालकृष्ण आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.” (Lal Krishna Advani)

Lal Krishna Advani : तरुण पिढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, विकासाचा ध्यास आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार अंगिकारत राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व लालकृष्ण आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहावे या विचाराने रथयात्रा काढून आडवाणीजींनी जनजागृती केली.अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यावर अडवाणीजींच्या योगदानाचे स्मरण ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हा पुरस्कार जाहीर केला, हे आपल्या भारतीय संस्काराचे द्योतक म्हणावे लागेल. आणीबाणी आणि त्यानंतर ढवळून निघालेल्या राजकीय पटलावर जनसंघ आणि भाजपच्या माध्यमातून देशहिताचा विचार मांडत राहून त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका कायम चोख निभावली.

उपपंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहणार आहे. राजकारणातील तरुण पिढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावणाऱ्या आडवाणीजी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्रीही अनोखी होती. हिंदुत्वाचा विचार आणि श्रीरामाचा ध्यास असलेली ही दोन व्यक्तिमत्वे सकारात्मक राजकीय साथीदार होते. भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना प्रणाम.”

हेही वाचा

Back to top button