कोल्हापूर : बलात्कारानंतर तरुणीला ब्लॅकमेल करून लुबाडले | पुढारी

कोल्हापूर : बलात्कारानंतर तरुणीला ब्लॅकमेल करून लुबाडले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन कॉलेज तरुणीच्या असहायतेचा फायदा घेत बलात्कार केला. सोशल मीडियावर बदनामी करून कुटुंबीयाला ठार मारण्याची धमकी देत तिच्याकडून 6 लाख 45 हजारांच्या दागिन्यांसह रोकड लाटल्याचा धक्कादायक प्रकार पाचगाव (ता. करवीर) येथे घडला. करवीर पोलिसांनी मुख्य संशयितासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात एका सराफी कारागिराचा समावेश आहे.

मुख्य संशयित आदिनाथ विजय उगळे (वय 25, रा. अमृतनगर, गिरगाव रोड, पाचगाव, ता. करवीर), तन्मय राजाराम सुतार (20, नंदगाव, ता. करवीर), रोहित मधुकर काळे (25, गाडगीळ कॉलनी, शांतिनगर, पाचगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

यापैकी रोहित काळे हा सराफी कारागीर आहे. संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. गिरगाव रस्त्यावरील हिलटॉप लॉजवर नेऊन पीडितेवर बलात्कार करून सोशल मीडियावर बदनामीची धमकी देत 16 तोळ्यांचे दागिने लाटले. या घटनेनंतर पाचगावसह पंचक्रोशीत संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. सामाजिक संस्था, तरुण मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह महिला संघटनांनी या कृत्याचा निषेध करून संशयितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. परिसरात तणावपूर्ण स्थिती आहे.

ओळखीचा फायदा घेत लगट

करवीर पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, कामधंदा न करता मोकाट फिरणार्‍या आदिनाथ उगळे याची सोशल मीडिया, इन्स्टाग्रामद्वारे अकरावीत शिक्षण घेणार्‍या 17 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. तिच्या असहायतेचा फायदा घेत त्याने तिच्याशी लगट केली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पाचगाव येथील लक्ष्मीनारायण हॉल, भवानी मंडप या ठिकाणी त्यांची भेट होऊ लागली. तरुणीच्या स्वभावाचा गैरफायदा घेत संशयिताने तिला गिरगाव (ता. करवीर) येथील हिलटॉप लॉजवर नेऊन दोनवेळा बलात्कार केला. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर उगळे याने आपणावर कर्ज झाल्याने आर्थिक संकटात असल्याचा बहाणा केला. तरुणीकडे पैशांचा तगादा सुरू केला. शिवाय, घरातील सोन्याचे दागिने आणून देण्यासाठी सक्ती करू लागला. तरुणीने घरातील मंडळींना काहीही न सांगता 16 तोळे दागिने आणून संशयिताला दिले.

बदनामीसह कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी

कालांतराने तरुणीने दिलेल्या दागिन्यांची संशयिताकडे मागणी केली. मात्र, दागिने देण्यास नकार दिला. उलट तुझा मित्र तन्मय सुतार याला 16 तोळ्यांचे दागिने दिले आहेत. असे घरातील मंडळींना सांगण्यास तिला भाग पाडले. दागिने व रोकड मला दिल्याचे घरातील लोकांना सांगितल्यास प्रेमसंबंधाची माहिती तुझ्या घरातील लोकांना सांगेन, सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करेन, तुझ्यासह घरातील लोकांना जिवंत ठेवणार नाही, अशीही त्याने तरुणीला धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मित्राविरुद्ध फिर्याद; मात्र चौकशीत संशयिताचे कारस्थान उघड

संशयिताने दिलेल्या धमकीमुळे भेदरलेल्या तरुणीने कुटुंबीयांसह करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तन्मय सुतार याच्याविरुद्ध चार दिवसांपूर्वी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्यास अटक केली. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी सुतार याच्याकडे केलेल्या चौकशीत मुख्य संशयित आदिनाथ उगळे याच्या कृत्याचा भांडाफोड झाला. तपासाधिकार्‍यांनी पीडित तरुणीला विश्वासात घेऊन तिच्याकडेही कसून चौकशी केली असता, या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.

सराफी कारागीरही जेरबंद

करवीर पोलिसांनी मुख्य संशयित उगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळल्या. उगळे याने तरुणीकडून घेतलेले दागिने सराफी कारागीर रोहित काळेला विक्री केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी काळे याला अटक केली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी सांगितली.

Back to top button