वीजबिलांच्या थकबाकीला चाप लावण्यासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर! | पुढारी

वीजबिलांच्या थकबाकीला चाप लावण्यासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर!

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीवर उपाय म्हणून ‘जेवढे पैसे तेवढा टॉकटाइम’ या मोबाइलसारख्या हिशेबाच्या धर्तीवर ‘जेवढे पैसे तेवढे युनीट वीज’ वापरण्याची सोय म्हणून ‘प्री-पेड’ स्मार्ट वीज मीटर राज्यात सर्वत्र लवकरच मोफत लावण्यात येणार आहेत. मीटर नादुरुस्त झाल्यास ते मोफत बदलून देण्यात येण्याची सुविधाही मिळणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांवर स्मार्ट मीटरचा कोणताही अतिरिक्त आर्थिक भुर्दंड लागणार नाही.

वाढती थकबाकी तसेच वीजगळती आणि वीजचोरीला चाप लावण्यासाठी डिश टीव्ही रिचार्ज आणि मोबाईल रिचार्जच्या धर्तीवर ही ‘प्री-पेड’ स्मार्ट वीज मीटर काम करणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व वीजग्राहकांकडे ‘प्री-पेड’ स्मार्ट वीज मीटर बसविले जाणार आहेत. प्री-पेड स्मार्ट मीटर असणाऱ्यांच्या बाबतीत मीटर रिडींग, बिल देणे, त्यांची वसुली करणे आणि बिल भरण्यास विलंब या गोष्टी टळणार आहेत.

महावितरणला घरोघरी वसुलीची मोहीम राबवून आर्थिक स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या तारेवरची कसरत करावी लागते. महावितरणने सदैव थकबाकीच्या चक्रव्युहात अडकलेल्या वीज ग्राहकांना प्री-पेड स्मार्ट मीटरचा उतारा देत, वाढत्या थकबाकीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वच राज्यांतील वीजग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये कृषिपंपांच्या वीजजोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील 2 कोटी 41लाख वीजग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे.

सुट्टी दिवशी रिचार्ज संपला तर मिळणार हॅपी अवर्स

स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे तसेच रिचार्ज संपत आल्याची माहितीदेखील मोबाईलद्वारे मिळणार आहे. त्यानुसार वीजवापर तसेच आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे. स्मार्ट मीटरमधील रिचार्ज संपल्यानंतरही रात्री 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होणार नाही. रिचार्ज संपल्यानंतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही. हॅप्पी अवर्स असल्यामुळे सावर्जनिक सुटीच्या दिवशी किंवा रात्री-बेरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका नाही. हॅपी अवर्समध्ये वापरलेल्या विजेचे पैसे रिचार्ज केल्यानंतर कपात होणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button