नागपूर : २०० दिवसानंतरही समृद्धी अपघातातील मृतांचे वारस मदतीपासून वंचित | पुढारी

नागपूर : २०० दिवसानंतरही समृद्धी अपघातातील मृतांचे वारस मदतीपासून वंचित

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी झालेल्या भीषण ट्रॅव्हल्स अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातामुळे अनेकांची कुंटुंबे उद्धवस्त झाली. या अपघाताला २०० दिवस लोटून गेले आहेत. तरीही संबंधितांवर परवाना रद्दची कारवाई झालेली नाही. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या घोषणेनुसार पीडित कुटूंबियांना प्रत्येकी २५ लाखाची मदत अजूनही मिळाली नाही. त्यामुळे आज (दि.१९) दुपारी या अपघातात मृत झालेल्या कुटुंबियांनी संविधान चौकात राम नाम जप सुरू करीत आंदोलन केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालय परिसरात आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आंदोलक संविधान चौकात आंदोलनाला बसले.

नागपूरहून- पुण्याला निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सचा १ जुलै २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ अपघात झाला होता. या अपघातात २५ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. अपघातानंतर उपमुख्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांनी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखाच्या मदतीची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात राज्य शासनाकडून ५ लाख व केंद्राकडून २ लाखांचीच मदत मिळाली. २०० दिवसानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनुसार पीडित कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत मिळाली नाही. पीडित कुटुंबियांनी वेळोवेळी आमदार, खासदार, राज्यपालांची भेट घेत मदतीची मागणी केली. तसेच ट्रॅव्हल्स कंपनीची मान्यता रद्द करणे, अपघातातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधींनी विधानसभा-लोकसभेत प्रश्न मांडला. परंतु पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे वर्धेतील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन सुरू झाले. मात्र, तरीही न्याय मिळाला नाही.  त्यानंतर आंदोलकांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालय परिसरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना नोटीस देत फडणवीसांच्या कार्यालयापुढे आंदोलन केल्यास दाखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाईची नोटीस दिली. त्यामुळे हे आंदोलन संविधान चौकात करण्यात आले. नंतर आंदोलक न्यायासाठी फडणवीस यांच्या कार्यालयापुढे जाणार असल्याची माहिती चंद्रशेखर मडावी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

हेही वाचा :

Back to top button