दहा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | पुढारी

दहा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

वांबोरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील बाजारपेठेच्या वांबोरी गावासह परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना तब्बल 10 दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. वांबोरीकरांवर निर्जळीचे संकट घोंगावत आहे. याविषयी वारंवार तक्रारी करूनही तोडगा निघत नाही. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन देत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राहुरी तालुक्यात वांबोरी ग्रामपंचायत लोकसंख्येने मोठी आहे. वांबोरीला ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत आदर्श गावाचा नावलौकिक मिळाला, परंतु काही दिवसांपासून गावासह परिसरात पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतचे नियोजन ढासळले आहे. गावात काही भागात अस्वच्छ ( गढूळ ) पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. नियमित पाणीपुरवठा वेळेत होत नाही. याबाबत गांभीर्याने विचार करून तत्काळ पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.

‘वांबोरीला पाणीपुरवठा करणारा साठवून तलाव पाणी संपल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाणी संपण्याअगोदर 8 दिवस पाटबंधारेला कळविले, परंतु पाणी येण्यास उशीर झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तो सुरळीत केला आहे.

– बाळासाहेब ठाकरे,वांबोरी ग्रामविकास अधिकारी

हेही वाचा

Back to top button