धक्कादायक : पिंपळसुटी येथील सात एकर ऊस आगीत खाक | पुढारी

धक्कादायक : पिंपळसुटी येथील सात एकर ऊस आगीत खाक

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा :  पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील फिरंगाई मळा परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन शेतकर्‍यांचा सुमारे सात एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये पोपट बबन खराडे यांचा 4, मानसिंग यशवंत फराटे यांचा 2 व विठ्ठल दादासाहेब फराटे यांच्या एक एकर उसाचा समावेश आहे. ही घटना सोमवारी (ता. 15) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मानसिंग फराटे यांच्या उसाची तोडणी संक्रांतीच्या सणामुळे सोमवारी बंद होती.
दुपारी चारच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. आकाशात धुराचे लोट दिसल्याने सुनील फलके, उत्तम कांबळे, ऋषी फराटे, अप्पासाहेब फराटे, निवास वाबळे, नवनाथ फराटे, दशरथ पारखे, सोनू खराडे आदींनी उसाच्या शेताकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता व सतर्कतेमुळे सात एकरांवरच आग मर्यादित राहिली. अन्यथा तब्बल 15 ते 20 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असता.  तोडणीस आलेला ऊस शॉर्टसर्किटमुळे जळल्याने शेतकर्‍यांचे मोठे झाले.  दरम्यान, दौंड शुगर कारखान्याने या उसाची मंगळवारी (दि. 16) तोडणी सुरू केली. मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणी केल्याने जमीन कडक होत आहे. या उसाचा खोडवा राखता येणार नसल्याचे संबंधित शेतकर्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button