कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शूटिंग; अक्षय कुमार, सारा अली खान मुख्य भुमिकेत | पुढारी

कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शूटिंग; अक्षय कुमार, सारा अली खान मुख्य भुमिकेत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फुरसुंगी, देवाची उरुळी येथील कचरा डेपोचे महापालिकेने गेल्या काही वर्षांत रुपडे पालटून तिथे वन उद्यान फुलवले आहे. या ठिकाणी देश-विदेशातून अभ्यासक येऊ लागले असतानाच आता बॉलीवूडलाही या ठिकाणाची भुरळ पडली आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खानच्या चित्रपटाचे शूटिंग याठिकाणी होणार आहे. यासाठी चित्रपटाचे व्यवस्थापन करणार्‍या कंपनीने महापालिकेकडे  चित्रपटाचे शूटिंग करण्याची परवानगी मागितली आहे.
 न्यायालयाच्या आदेशनानुसार फुरसुंगी, देवाची उरुळी येथील कचरा डेपोवरील ओपन डम्पिंग बंद करण्यात आले आहे. या ठिकाणच्या काही एकरवरील कचर्‍याचे लॅन्डफिलिंग करून त्यावर झाडे लावण्यात आली आहेत. तर दहा लाख टनाहून अधिक कचरा बायो मायनिंग प्रक्रियेद्वारे काढून जागा मोकळी करण्यात आली आहे. कॅपिंग केलेल्या कचर्‍याचे डोंगर वृक्षराजींनी नटल्यानंतर या डेपोचे रुपडे पालटले आहे. आगीच्या घटना बंद झाल्या असून कचर्‍याचा दर्प बर्‍याच अंशी नाहीसा झाला आहे. ज्या भागात अद्याप कचरा आहे तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे, त्याठिकाणी सातत्याने औषध फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे माशा व दुर्गंधी दोन्ही हद्दपार झाले आहेत.
पिसोळीहून सासवड रोडच्या दिशेने येणार्‍या रस्त्यावर कचरा डेपोतून निघणारे लिचेड ज्या खाणीत साठायचे ती बुजवून त्यावर सिमेंट काँक्रीट करण्यात आले आहे. आता तेथे छोटे क्रिकेट स्टेडियम झाले असून परिसरातील मुले तिथे क्रिकेट खेळतात. याचा वापर अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खान च्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी होणार आहे. चित्रीकरणात हेलिपॅड म्हणून करण्यात येणार आहे. तर उर्वरित भागात लष्करी कॅम्प दाखविण्यात येणार आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पाच दिवस होणार्‍या प्रत्यक्ष शूटिंगच्या तयारीसाठी 26 जानेवारी पासून कचरा डेपोच्या कॅपिंग केलेल्या आणि काँक्रेटिकरण केलेल्या जागेची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने मागील काही वर्षात कचरा डेपोचा शास्त्रीय दृष्ट्या कायापालट केला आहे. कचरा डेपोचे बदलललेले स्वरूप पाहण्यासाठी देश विदेशातील प्रशासनातील अधिकारी, पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थी येतात, ही प्रशासनासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता चित्रपटाच्या शूटिंगसाठी मागणी होत आहे, याचा आनंद आहे. येथे चित्रपट शूटिंग मधून महापालिकेला आर्थिक उत्पन्न देखील मिळणार आहे.
-संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन
हेही वाचा

Back to top button