IPL 2024 : लोकसभा निवडणूक असली तरीही यंदाचे आयपीएल भारतातच? | पुढारी

IPL 2024 : लोकसभा निवडणूक असली तरीही यंदाचे आयपीएल भारतातच?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतात सध्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. फेब्रुवारीपासून मेपर्यंत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया चालणार आहे. त्याचदरम्यान भारतात जगातील सर्वात मोठी स्पर्धा आयपीएल होत असते. निवडणुकांमुळे यंदाची आयपीएल विदेशात हलवावी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, बीसीसीआय आयपीएलचा संपूर्ण हंगाम भारतात खेळवण्यासाठी उत्सुक आहे. त्या द़ृष्टीनेच तयारी सुरू असल्याचे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले असून आयपीएल भारतातच होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. (IPL 2024)

जगातील सर्वात मोठी टी-20 लीग ही यंदा 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएलची अधिकृत तारीख ही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर घोषित करण्यात येईल. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बीसीसीआयने आयपीएलचा हंगाम हा भारतातच खेळवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

बीसीसीआय सूत्राने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार ‘आयपीएल देशाच्या बाहेर खेळवली जाईल, अशी शक्यता नाही. लोकसभा निवडणूक आणि आयपीएल हंगाम एकाचवेळी होत आहे. त्यावेळी जे कोणते राज्य योग्य कारणामुळे आयपीएल सामना आयोजित करण्यास उत्सुक नसेल तर तो सामना दुसर्‍या ठिकाणी हलवण्यात येईल.’ (IPL 2024)

महिला प्रीमियर लीग दिल्ली, बंगळूर या दोन शहरांत होणार

बीसीसीआय गेल्यावर्षापासून महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) चे आयोजन करीत आहे. त्यावेळी सर्व सामने एकाच शहरात खेळवण्यात आले होते. मुंबईतील वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने खेळवण्यात आले होेते. पहिल्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणून यावेळी स्पर्धा अधिक आकर्षक आणि उत्कंठावर्धक करण्यासाठी बीसीसीआयने डब्ल्यूपीएल दोन शहरांत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दिल्ली आणि बंगळूर शहराची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेतही मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, गुजरात जायंटस् आणि यूपी वॉरियर्स हे संघ सहभागी होत आहे.

हेही वाचा :

Back to top button