शहरात सात गँगस्टर तुरुंगाबाहेर; पोलिसांची डोकेदुखी वाढणार.. | पुढारी

शहरात सात गँगस्टर तुरुंगाबाहेर; पोलिसांची डोकेदुखी वाढणार..

पुणे : शहरातील प्रमुख अकरा टोळ्यांच्या म्होरक्यांपैकी तब्बल सात जण कारागृहाच्या बाहेर पडले आहेत. तर तिघा टोळीप्रमुखांचा खून झाला आहे. शहरातील लहान-मोठ्या टोळ्यांचा विचार केला तर 30 पेक्षा अधिक टोळ्या शहरात सध्या कार्यरत असल्याची माहिती आहे. दरम्यान, शरद मोहोळ याच्या खुनामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गुन्हेगारी टोळक्यांचा बंदोबस्त करून पोलिसांचा त्यांच्यावर धाक राहण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांनी एन्काऊंटरचे हत्यार वापरून डोईजड झालेल्या चार ते पाच गुंडांचा कायमचा बंदोबस्त केला होता. तर तत्कालीन सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी मोक्काचा प्रभावी वापर करून अनेक टोळ्यांची पळता भुई थोडी करत भाई, दादांची भाईगिरी मोडीत काढली. पुढे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि रितेशकुमार यांनी मोक्का, एमपीडीए आणि तडीपारी या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर केला. दोघांनी तीन वर्षात तब्बल 227 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

त्यामुळे मागील काही वर्षात शहरातील टोळीयुद्धाला मोक्का कारवाईच्या औषधाचा डोस दिल्यानतंर शहरात गुन्हेगारीला चांगलीच जरब बसली होती. मोक्काची कारवाई होण्याच्या भितीने टोळक्यांनी आपला हात आवरता घेतल्याचे पाहायला मिळाले. बोटावर मोजण्या एवढ्या घटना वगळता, शहरात टोळीयुद्ध मागील काही वर्षात शमल्याचेच पहायला मिळाले. मात्र आता अनेक टोळीप्रमुख बाहेर पडले आहेत. त्यातच शरद मोहोळ याचा भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला.

त्याचा खून करणार्यांनी जमीनीचा वाद आणि पुर्वी झालेल्या वादातून हा खून केल्याचे सांगितले आहे. मात्र पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्ववादाची लढाई पहाता शरद याचा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला याचा पोलिस शोध घेत आहेत. हल्लेखोरांनी शरद याचा खून केल्यानंतर एका गँगस्टरच्या नावाचा उल्लेख केला. त्याचा गुन्हेगारी पुर्व इतिहास पहात हा खून टोळीयुद्धातून तर झाला नाही ना असा सवाल देखील उपस्थित झाला आहे.

मायानगरीचा प्रवास पुण्याकडे

मायानगरी मुंबईतील टोळीयुद्धाचे लोण पुण्यात कधी पोहचले हे समजलेच नाही. त्या काळातही मुंबई टोळींशी पुण्यातील गुन्हेगार संपर्कात असत. मात्र जमीनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातील दहशत आणि दडपशाही यामुळे पुण्यात स्थानिक टोळ्या निर्माण झाल्या. त्या टोळ्या अनेक बांधकाम व्यावसायिक आणि तसेच खरेदी विक्रीचे व्यवहार करणार्‍या व्यावसायिकांनी पोसल्या. त्यांच्याकडून सातबारा कोरा करणे, खंडण्या वसूल करणे, आयटी क्षेत्रातील भंगाराचा ठेका घेणे अशी कामे सुरू झाली. ही कामे मिळविण्यासाठी टोळ्यात वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली. पुढे याचे पर्यवसान परस्पर विरोधी टोळ्यातील प्रमुखांचा काटा काढण्याच्या दिशेने झाले.

निवडणुका अन् गुन्हेगारीचे समीकरण

अनेक टोळ्यांमध्ये पूर्ववैमनस्याबरोबरच वर्चस्ववादाची लढाई आहे. तर काही टोळ्यांचे दादा कारागृहातून बाहेर आल्यानंतर शांततेच्या भूमिकेत देखील असल्याचे दिसून येते. दरम्यान लोकसभा, विधानसभेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. स्थानिक गुन्हेगार आणि त्यांना राजकीय व्यक्तींकडून मिळणारा राजाश्रय अनेकदा समोर आला आहे. एवढेच नाही तर गुन्हेगारी साम्राज्याचा विस्तार वाढवण्यासाठी व स्वत:च्या बचावासाठी टोळ्यांच्या दादाकडून राजकीय आश्रयाचा आधार घेतला जातो. त्यामुळे ऐन निवडणूकांच्या कालावधीत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सक्रिय झाल्यास पोलिसांची डोकेदुखी वाढू शकते.

जमिनीचे वादच प्रमुख कारण

पुण्यात नव्वदच्या दशकात सुरू झालेले आयटी हब आणि त्याच बरोबरीने जमिनीला आलेले सोन्याचे भाव, यामुळे गुन्हेगारांचा शिरकाव जमीन व्यवहारात झाला. त्यामुळे त्या भागात गुन्हेगारांच्या टोळ्या आणि त्यांची दहशत सुरू झाली. अनेकदा या टोळ्या परस्परांना भिडल्याने काही खून पडले. तर त्याचा बदला म्हणून समोरच्या टोळ्यांतील गुंड मारण्यात आले. तेथूनच सुरू झाला रक्तचरित्राचा प्रवास.

हेही वाचा

Back to top button