सत्ताधारी भाजपमध्ये राजीनामा नाट्य; नगरसेविकेसह पतीचा पक्षाला रामराम | पुढारी

सत्ताधारी भाजपमध्ये राजीनामा नाट्य; नगरसेविकेसह पतीचा पक्षाला रामराम

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत नाराजीला तोंड फुटले आहे. पक्षातील कुरघोड्यांना वैतागून एका नगरसेविकेने पदाचा आणि पतीने संघटनेतील पदाचा राजीनामा पक्षाच्या जेष्ठ नेत्याकडे सोपविला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ माजली आहे.

महापालिका निवडणूका अगदी दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. महाविकास आघाडी आणि त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या काही नगरसेवकांना गळाला लावल्याची चर्चा आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर या पक्षांतराच्या उड्या पडतील, असे सांगण्यात येत आहे. त्यापूर्वीच भाजपमध्ये मात्र अंतर्गत कलह सुरू असल्याचे समोर आले आहे.

आमदार आणि संघटनेतील पदाधिकार्‍यांच्या तक्रारींना वैतागून एका नगरसेविकेने आणि तिच्या पतीने त्यांच्या पदाच्या आणि पक्ष संघटनेचाही तडकाफडकी राजीनामा दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या एका नेत्याकडे सोपविला.तसेच पक्षातील काही मंडळी अशी चुकीची कामे करण्यासाठी आपल्यावर दबाव आणत असून त्यास विरोध केल्यानंतर वरिष्ठांकडे आपल्या विरोधात चुकीच्या तक्रारी करत असल्याची कैफियत मांडली.

संबधित नेत्याने त्यांचा राजीनामा न स्वीकारता या दाम्पत्यांची बाजू ऐकून घेतली. तसेच यासंदर्भात आपण बैठक घेऊन दोन्ही बाजू जाणून घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन नगरसेविका आणि तिच्या पतीला दिले. त्यामुळे तूर्तास तरी हे राजीनामा नाट्य थांबले असल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छता गृह पाडण्यासाठी आमदारांचा दबाव !

संबधित नगरसेवकांच्या प्रभागात असलेले आणि त्यांनीच उभारलेले स्वच्छतागृह पाडण्यासाठी पक्षातील एक आमदार या नगरसेवकावर दबाव आणत आहे. तर बिल्डरने बुजविलेल्या नाल्याविरोधात तक्रार करू नये यासाठी पालिकेतील एक पदाधिकारी या नगरसेविकेवर दबाव आणत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचलं का?

Back to top button