

22 ते 28 नोव्हेंबर 2021 हा जागतिक वित्त आठवडा असून याबाबत अर्थसाक्षरता वाढवण्यासाठी 'सेबी' प्रयत्न करत आहे. त्यानिमित्त…
अर्थ निरक्षरतेचा झाकोळ वाढत असून आर्थिक फसवणूक पारंपरिक, जुन्या मार्गांसोबत नवतंत्राचा वापर करीत त्याचे प्रमाण वाढत आहे. बँका, पोस्ट खाते यातील ठेवींवरील घसरलेले व्याज दर, महागाई दरातील वाढ यामुळे अधिक परतावा देणार्या योजनांचा शोध घेणारे सहजपणे फसव्या योजनेचे ग्राहक बनतात. यातून आपली सर्व बचत व काही वेळा कर्ज काढून केलेली गुंतवणूक पूर्णतः बुडण्याची शक्यता असते. जागरुकपणे, अभ्यासपूर्वक व योग्य सल्ला घेऊन केलेली गुंतवणूक शहाणपणाची व सुरक्षित ठरते. यासाठी फसवणुकीचे तंत्र, पद्धत माहिती असेल, तर आपण सावधानता बाळगू शकतो.
बँकेतील व्याज दरापेक्षा दुप्पट अथवा 15 ते 20 टक्के परतावा देणार्या योजनांचा धुमाकूळ सुरू असून यामध्ये शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही या योजनांनी हातपाय पसरले आहेत. कमोडीटी ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फायदा देऊ, असे सांगून गुंतवणुकीस आकर्षित करतात. एक लाखास महिना तीन हजार व्याजाच्या योजनेतही लोक फसले आहेत. लिमिटेड पार्टनरशिपवरूनही फसवले जाते. बाँडवर करार, भविष्यातील धनादेश याचाही विश्वास संपादनास वापर केला जातो.
टॅक्सीप्रमाणे मोटारसायकलचा वापर करणार्या योजनेत आपण बाईकसाठी गुंतवणूक करायची व त्यासाठी एक, दोन अथवा चार बाईकची रक्कम दिल्यास दरमहा उत्पन्न देणारी ही योजना होती. साखळी पद्धतीच्या या योजनेत मध्यस्थांना भरघोस कमिशन होते. 2017 मध्ये संजय भाटी यांनी गॅरविट इनोव्हेशन प्रमोटर्स (जीआयपीएल) या नावे कंपनी काढून 15 हजार कोटींची फसवणूक केली.
रिझर्व्ह बँकेमार्फत वित्तीय घोटाळा किंवा फसवणूक कशी केली जाते आणि त्याबाबत आपण कोणती सजगता आणि सावधानता बाळगली पाहिजे, याबाबत विस्तृत माहिती पुस्तिका प्रकाशित केली असून तिचा वापर करणे आवश्यक आहे. फसवणुकीचे प्रकार तंत्रकुशल होत असल्याने थोडे दुर्लक्ष किंवा चूक फार मोठे नुकसान करू शकते. सामाजिक माध्यमांतून जसे फेसबुक, व्हॉटस् अॅप यातून आपण आपली ओळख, जन्म दिनांक, व्यवसाय, आवडी, मते आणि विशेष माहिती जसे की नवी खरेदी, सहल याबाबत उत्साहाने माहिती देत असतो. यातील काही माहिती वापरून आपल्या न कळत फसवणुकीची योजना तयार केली जाते. मोबाईल, ई-मेल, अॅप्स यातून ही माहिती चोरली जाते. अनेक वेळा आपणच ही माहिती देत असतो. अॅपबाबत विविध परवानगी देत असतो. हे सर्व आपल्या घराची दारे, खिडक्या उघडे ठेवून फसवणूक करणार्या चोरांना खुले आमंत्रण देत असतो. हे टाळणे सहज शक्य आहे. यासाठी फसवणूक तंत्रे माहिती करून घेऊ.
यामध्ये फसवणूकदार प्रसिद्ध बँकेच्या किंवा ई-कॉमर्स संकेतस्थळाशी अत्यंत साम्य असणारी संकेतस्थळांची निर्मिती करतात. या संकेतस्थळाबाबतचे एसएमएस, सोशल मीडिया ई-मेलमार्फत सतत पाठवले जातात. एखादी फायद्याची योजना यात सांगितली जाते. अनेकजण अशा संकेतस्थळास नीट न पाहता आपली महत्त्वपूर्ण माहिती भरतात. आपण मूळ बँकेला किंवा जेथे खरेदी करणार, त्या संकेतस्थळावर भेट दिल्याचे वाटते. परंतु, येथे फसगत होते. आता ही माहिती हाती लागताच फसवणुकीचा प्रयत्न सुरू होतो. अशा एसएमएस किंवा ई-मेलमार्फत आलेल्या माहितीस त्वरित काढून टाकावे. विशेषतः जेथे पैशाचे व्यवहार करावयाचे आहेत, तेथे आपली माहिती भरताना काळजीपूर्वक भरावी.
फसवणुकीसाठी सातत्याने वापरले जाणारे तंत्र म्हणजे फसवे फोन कॉल. बँकेतून, विमा कंपनीतून, सरकारी कार्यालयातून बोलत आहोत, असे भासवून जन्म दिनांक, क्रेडिट कार्ड क्रमांक, ओटीपी याची माहिती विचारली जाते. आपण ही माहिती तातडीने दिली नाही, तर दंड होईल किंवा खाते बंद होईल, व्यवहार थांबवले जातील अशी भीती घातली जाते. फोन करणारे आपल्या नावाने फोन करतात. त्यामुळे पटकन विश्वास बसतो. खरे तर ट्रू कॉलर या अॅपमुळे सहज फोन क्रमांकावरून नाव समजते. आपली माहिती, थोडे बँक तपशील या आधारे तुमच्या खात्यासंबंधी माहिती काढली जाते. क्रेडिट/डेबीट कार्डचे तपशील, ओटीपी या आधारे खात्यातील पैसे काढले जातात. आपली विमा रक्कम देय असून ती तुम्हाला पाठवण्यासाठी बँक खाते क्रमांक कळवण्यास सांगितले जाते. येथे खरे तर आपण कोणता विमा घेतला होता, हा प्रश्न न तपासता माहिती दिली जाते व फसगत होते. खरे तर, बँक आपणाकडून कधीही असे तपशील फोनवरून मागत नसते. तशा सूचना बँकेत आणि एसएमएसमधून सातत्याने दिल्या जातात. परंतु, काही लोक माहिती देतात. वित्त संस्था, बँका ग्राहकाचा पासवर्ड, कार्ड तपशील, ओटीपी, सीव्हीव्ही अशी गुप्त व महत्त्वाची माहिती फोनवरून घेत नाहीत.
आपण ऑनलाईन विक्री व्यवस्थेमार्फत वस्तू विकू शकतो. घरातील फर्निचर, जुना मोबाईल, कार यासारख्या वस्तूंचे फोटो आणि अपेक्षित किंमत अपलोड केलेली असते. अशा वस्तूंचे ग्राहक बनून येथे फसवणूक केली जाते. ही पद्धत आपण एक उदाहरणाने पाहू. समजा श्री. सुनिल यांना घरातील सोफा सेट विकायचा आहे. त्यांनी सोफासेटचे फोटो व अपेक्षित किंमत 10 हजार रुपये सांगितली. आता फसवणूक करणारा ग्राहक पुढील पद्धत वापरतो.
1) सोफासेट पसंत असून खरेदी करणार आहे, असा संदेश दिला जातो. 2) पैसे खात्यावर पाठवण्यासाठी खाते क्रमांक व बँक तपशील घेतला जातो. 3) खात्याची खात्री करण्यासाठी तो आपल्या खात्यावर 100 रुपये पाठवत आहे व उर्वरित रक्कम हे 100 रुपये मिळताच पाठवितो, असे सांगितले जाते. 4) त्याचे 100 रुपये खात्यावर जमा होतात. तसा बँकेचा संदेश येतो व व्यवहाराची खात्री पटते. 5) आता उर्वरित रक्कम 9,900 रिक्वेस्ट मनी यूपीआय मार्फत पाठवितो व ते स्वीकारण्याची विनंती करतो. 6) रिक्वेस्ट मनीसाठी आपण पिन क्रमांक टाकताच आपल्या खात्यातून 9,900 रुपये जातात व आपली फसवणूक होते.