लेहमध्ये 15 हजार फूट उंचीवर फडकला तिरंगा | पुढारी

लेहमध्ये 15 हजार फूट उंचीवर फडकला तिरंगा

लडाखमधील लेह जिल्ह्यातील हनले खोर्‍यात भारतीय लष्कराकडून रविवारी 15 हजार फूट उंचीवर 76 फूट उंचीचा भारतीय तिरंगा डौलाने फडकावण्यात आला. याद्वारे आम्ही कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचा जणू संदेशच चीनला भारतीय लष्कराने दिला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय लष्कराने फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या सहकार्यातून हा तिरंगा फडकावला. रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भारतीय जवानांनी या तिरंग्याला सलामी दिली. यावेळी जवानांसह अनेक लष्करी अधिकारी उपस्थित होते. 15 हजार फूट उंचीवर डोलणारा हा 76 फूट उंचीचा तिरंगा चीनच्या भूमीवरूनही दिसतो.

चीनशी गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर आता कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. यापूर्वी भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील रेंजागला वॉर मेमोरियलवर 108 फूट उंचीचा तिरंगा फडकावला होता. 18 नोव्हेंबर रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 1962 ला चीनशी झालेल्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहिली होती.

तिरंगा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार

हनले खोर्‍यातील पर्यटन वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अवकाशातील नजारे ी या ठिकाणी यापूर्वी जगातील सर्वात उंच टेलिस्कोपही बसवण्यात आला आहे. आता नव्याने स्थापित करण्यात आलेला हा तिरंगा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनेल, असे प्रशासनाने सांगितले.

 

Back to top button