Blessing ! दहावर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे तीन बालकांना जीवदान | पुढारी

Blessing ! दहावर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे तीन बालकांना जीवदान

पुणे : सातार्‍यामध्ये दहावर्षीय मुलाचा अपघात झाल्याने त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रयत्नांची शर्थ करूनही दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले. समन्वयक आणि समुपदेशकांच्या पुढाकारामुळे पालकांनी मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. मुलाच्या अवयवदानामुळे तीन बालकांना नवसंजीवनी मिळाली. दहावर्षीय मुलगा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील असून, तो आई-वडिलांबरोबर कामासाठी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आला होता. बालकाला डिकसळमध्ये चारचाकी गाडीने धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्याला तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याची ससून रुग्णालयात 5 जानेवारीला रवानगी करण्यात आली. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत आणि त्याला ब्रेननडेड घोषित करण्यात आले. मुलाचे हृदय पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील रुग्णामध्ये, एक किडनी वानवडीतील कमांड हॉस्पिटल आणि दुसरी किडनी सिम्बायोसिस हॉस्पिटलमधील रुग्णामध्ये प्रत्यारोपण करण्यात आली.

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्यावर तिन्ही बालरुग्णांची स्थिती स्थिर असल्याचे डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आले. अवयवदानासाठी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. अनंतकुमार पांडे, ट्रामा आयसीयूमधील डॉ. सुजित क्षीरसागर, डॉ. हरिश ताटिया, डॉ. अनंत बिडकर, डॉ. रोहित बोरसे, डॉ. किरणकुमार जाधव, डॉ. संजय व्होरा, डॉ. सोनाली साळवी आदींचे योगदान लाभले.

  • अवयवदात्यांची संख्या – 58
  • अवयव प्रत्यारोपणकेलेल्या रुग्णांची संख्या – 148
  • किडनी – 75
  • यकृत – 43
  • हृदय – 9
  • फुप्फुस – 10
  • किडनी व स्वादुपिंड – 8
  • किडनी व यकृत – 2
  • हृदय व फुप्फुस – 1

अवयवदानासाठी प्रयत्न

अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे, अरुण बनसोडे, जगदीश बोरुडे व रत्नभूषण वाढवे यांनी अवयवदानाबाबत समुपदेशन केले असता कुटुंबीयांनी अवयवदानाला संमती दिली. पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या मुख्य समन्वयक आरती
गोखले यांनी सातारा ते पुणे व पुणे ते बुलडाणाकडे जाण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

पुणे विभागातील अवयवदान

महाराष्ट्रात 2023 मध्ये 148 अवयवांचे दान करण्यात आले. त्यामध्ये पुणे विभाग अव्वल क्रमांकावर आहे. पुणे विभागात 58, मुंबईमध्ये 49, नागपूरमध्ये 35, छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 असे प्रमाण आहे.

हेही वाचा

Back to top button