सत्ता आल्यास पहिली सही अंगणवाडी भगिनींसाठी : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

सत्ता आल्यास पहिली सही अंगणवाडी भगिनींसाठी : खासदार सुप्रिया सुळे

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत आरक्षण देण्याचा विषय जो पक्ष सोडवेल त्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उभा राहील, तसेच राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर पहिल्यांदा शेतकर्‍यांना कर्जमुक्त करू आणि महिलांसाठी पहिली सही अंगणवाडी भगिनींसाठी असेल, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. 4) येथे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसवर पुढचे वर्षभर निवडणुकांची जवाबदारी असेल, असे सांगून सुळे म्हणाल्या, की महाराष्ट्रासमोर सध्या सर्वांत मोठे आव्हान पाण्याचे असणार आहे. बीड व उस्मानाबाद येथे प्रचंड पाण्याची अडचण आहे. मात्र सरकार याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. ट्रिपल इंजिनचे हे खोके सरकार फक्त पक्ष फोडा व कुटुंब तोडण्यात व्यस्त आहे.

संबंधित बातम्या :

माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही, तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीविरोधात आहे, असे स्पष्ट करून सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल झाला तरच विकास होईल, असे सांगून त्या म्हणाल्या, की भारतीय जनता पक्ष आधी म्हणत होता ना खाऊंगा ना खाने दुंगा. आता मै भी खाऊंगा और आपको भी पेट भर के खाने दुंगा. पन्नास खोक्यांवर जर आमदार विकला जात असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे, पन्नास खोके इज नॉट ओके. भ्रष्टाचाराच्या विरोधात जसा त्यांनी आपल्यावर हल्ला केला होता, तसा आता मी त्यांच्यावर करणार आहे. ही लढाई माझ्या वडिलांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे.
महाराष्ट्रातील सर्व विकास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, यांनी दहा वर्षांत काय केले? असा सवालही त्यांनी केला. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पहिली सही करेल ती शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

अजितदादांना पुन्हा संधी नाही
मेट्रोपेक्षा जास्त प्रिय मला एसटी आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एक वर्षात राज्यातील सर्व पब्लिक ट्रान्सपोर्ट चकाचक करू. अजितदादांना परत फाटकी एसटी दाखवण्याची संधी आम्ही देणार नाही, असा चिमटाही सुप्रिया सुळे यांनी काढला. शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्याला सोन्याचे दिवस होते. ते दिवस पुन्हा आणायचे आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Back to top button