Pune News : मद्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त | पुढारी

Pune News : मद्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या मध्यरात्री खेड शिवापूर टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या गोव्यातील एक कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले. एकूण 1300 बॉक्स जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये बिअरचे 500 बॉक्स तर व्हिस्की रमचे 800 बॉक्स आहेत.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मद्य मोठ्या प्रमाणावर पुणे शहर परिसरात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेडशिवापूर टोलनाक्याजवळ पथकाने संशयित ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या. तपासणीत मद्याची निर्मिती गोव्यात करण्यात आल्याची माहिती मिळाली.

पथकाने ट्रकमधील एक हजार मद्याची खोकी जप्त केली. या कारवाईत ट्रक तसेच मद्याच्या बाटल्या असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालकासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, पुणे विभागाचे आयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे आणि पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणाचा तपास सासवड येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे.

रंगाच्या डब्याआडून मद्याची वाहतूक

राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मद्यतस्करांनी नामी शक्कल लढवली होती. रंगांच्या डब्याआडून त्यांनी ही वाहतूक सुरू केली होती. मात्र, उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांना माहिती मिळाली अन् त्यांचा डाव फसला.

अवैध मद्यतस्करी रोखण्याठी उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी उभारण्यात आली होती. तसेच तब्बल सतरा भरारी पथके तैनात करण्यात आली होती. बातमीदारामार्फत मिळालेली गोपनीय माहिती आणि तपासणी नाक्यामुळे एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

– चरणसिंह रजपूत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग

हेही वाचा

Back to top button