Weather Update : यंदा थंडीचा प्रभावच नाही! | पुढारी

Weather Update : यंदा थंडीचा प्रभावच नाही!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (112 टक्के) पडण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात देशात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने थंडी कमीच राहणार आहे. मध्य भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जानेवारी ते मार्च महिन्यातील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाने जाहीर केला. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. जानेवारी महिन्यात उत्तर
भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही थंडी कमी

यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी पडलीच नाही. डिसेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागली. मात्र उत्तरेकडील थंड वार्‍यांच्या अभावामुळे किमान तापमानात अपेक्षित घट झाली नाही. जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची शक्यता असल्याने थंडी कमी राहणार आहे. त्यात महाराष्ट्रातही थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे.

पावसाचे प्रमाण जास्त…

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक (112 टक्यांपेक्षा अधिक) पावसाची शक्यता आहे. या काळात देशात सरासरी 69.7 मिलिमीटर पाऊस पडतो. उत्तर भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या मध्यम ते तीव— एल-निनो स्थिती आहे. मार्च अखेर ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. तर सध्या घन अवस्थेत असलेला इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हळहळू सामान्य होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबरमधील पावसात घट..

ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात देशात 110.7 मिलिमीटर (91 टक्के) पाऊस पडला आहे. यात महाराष्ट्रातील पावसाची सरासरी 96.4 असून, मॉन्सूनोत्तर हंगामात राज्यात 59.3 मिलिमीटर (38 टक्के कमी) पाऊस झाला आहे. केवळ डिसेंबरमध्ये राज्यात सरासरी 4.6 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा डिसेंबरमध्ये राज्यभरात 6.1 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत 33 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

नगर 12.5, पुणे 13.6 अंशावर

मंगळवारपासून राज्यात किमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. नगर येथे मंगळवारी सर्वात कमी 12.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तर पुण्याच्या तापमानात 1 अंशाने वाढ होऊन पारा 13.6 अंशावर गेला होता.

राज्याचे मंगळवारचे तापमान

गोंदिया 12.5,पुणे 13.6, जळगाव 15.2, कोल्हापूर 17.8, महाबळेश्वर 15, नाशिक 14.5, सांगली 16.8, सातारा 14.1, सोलापूर 17, मुंंबई 22, रत्नागिरी 19, धाराशीव 16.6, छत्रपती संभाजीनगर 14.9, परभणी 16.1, नांदेड 16.8, बीड 15.9, अकोला 16.4, अमरावती 15.3, चंद्रपूर 14.4, वाशिम 15.6, वर्धा 14.9

3 ते 8 जानेवारी दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस..

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात 3 ते 8 जानेवारीपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण व मध्यमहाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा

Back to top button