IND vs SA : भारतापुढे बरोबरीचे आव्हान | पुढारी

IND vs SA : भारतापुढे बरोबरीचे आव्हान

केपटाऊन, वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (3 जानेवारी) येथे खेळवला जाणार आहे. सेंच्युरियन कसोटीतील दारुण पराभवानंतर भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र, केपटाऊनमध्ये होणारी दुसरी कसोटी जिंकून टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. या सामन्यात त्यांना शानदार कामगिरीची गरज आहे. विशेषत:, कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीला दमदार सुरुवात करावी लागेल. गेल्या 12 वर्षांत या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय सलामी जोडीने एकही शतकी भागीदारी केलेली नाही.

शनिवारी नेटमध्ये सराव करताना मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर रोहितने चांगले शॉटस् मारले. त्याने 45 मिनिटांपेक्षा जास्त काळ मुकेशच्या गोलंदाजीवर सराव केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या द़ृष्टीने आगामी काळातील सर्व कसोटी सामने जिंकणे टीम इंडियासाठी खूप गरजेचे आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

स्टार स्पोर्टस् या अधिकृत प्रसारक चॅनेलवर भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना टीव्हीवर थेट पाहू शकता. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामन्याला दुपारी 2.00 वाजता सुरुवात होईल.

न्यूलँडस् क्रिकेट ग्राऊंडचा इतिहास (IND vs SA)

केपटाऊनमधील न्यूलँडस् क्रिकेट मैदानावर आतापर्यंत 59 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले गेले आहेत. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारत यांच्यात येथे शेवटचा कसोटी सामना खेळला गेला, ज्यात भारताचा पराभव झाला. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा अलीकडचा विक्रम चांगला आहे, ज्याने 59 पैकी 27 कसोटी जिंकल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाने याआधी केपटाऊनमध्ये एकूण सहा कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, येथील त्यांचा रेकॉर्ड खराब राहिला आहे. आतापर्यंत या मैदानावर टीम इंडियाला एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने भारताला 4 वेळा पराभूत केले आहे, तर 2 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. या मैदानावर सर्वाधिक कसोटी विकेटस् घेणारा गोलंदाज डेल स्टेन आहे, ज्याने 29 डावांत 74 विकेटस् घेतल्या आहेत.

खेळपट्टी काय रंग दाखवणार?

केपन्यूलँडस् क्रिकेट ग्राऊंडवरील बहुतेक सामन्यांचे निकाल लागले, फार कमी सामने अनिर्णित राहिले. भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या कसोटीचा निकालही येथे लागण्याची शक्यता आहे. चांगली गोष्ट म्हणजे, येथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार आहे, ही भारतीय संघासाठी चांगली बातमी आहे. पीच क्यूरेटर म्हणाला की, खेळपट्टीवर गवत असेल. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत होईल, दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी फलंदाजांना मदत होईल. शेवटच्या दोन दिवसांत फिरकी गोलंदाज येथे वर्चस्व गाजवू शकतात. येथे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल. या मैदानावर रबाडाने 14 डावांत 42 विकेटस् घेतल्या आहेत. हाच गोलंदाज पहिल्या कसोटीत भारताला अडचणीत आणणारा आणि भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरला, त्यामुळे हा गोलंदाज या खेळपट्टीवरही भारतीय फलंदाजांना त्रास देऊ शकतो.

केपटाऊन आणि भारत:

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनादेखील केपटाऊनच्या न्यूलँडस् क्रिकेट मैदानात शतक झळकावता आले नाही; पण मागील वर्षी ऋषभ पंतने शतकी खेळी करून 11 वर्षांचा दुष्काळ संपवला.

यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2011 मध्ये शतक झळकावण्याची किमया साधली होती. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 32 वर्षांपासून कसोटी मालिका होत आहेत, ज्यामध्ये सातवेळा भारताने आफ्रिकेच्या धरतीवर ही मालिका खेळली आहे.

भारताला दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर नेहमीच कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागला आहे. आतापर्यंत एकदाही टीम इंडियाला आफ्रिकेला त्यांच्यात घरात जाऊन पराभूत करता आले नाही.

हवामान कसे असेल?

केपटाऊनमध्ये पहिल्या तीन दिवस पावसाचा अंदाज नाही. तुरळक ढग असतील. ताशी 22 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. 71 टक्के आर्द्रता राहील; पण शेवटचे दोन दिवस खराब हवामानामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो. ‘अ‍ॅक्युवेदर’च्या अंदाजानुसार, तीन दिवसांनंतर 6 जानेवारीला चौथ्या दिवशी 64 टक्के होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, सामन्याच्या पाचव्या दिवशी (7 जानेवारी) पावसाची 55 टक्के शक्यता आहे.

Back to top button