UP News : ‘नववधू गुटखा खाते…’ सासरच्या लोकांनी थेट गाठलं पोलिस स्टेशन! | पुढारी

UP News : 'नववधू गुटखा खाते...' सासरच्या लोकांनी थेट गाठलं पोलिस स्टेशन!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपर्यंत सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा व्यसनामुळे झालेल्‍या नुकसानीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र गुटाख्‍याच्‍या व्यसनामुळे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील नववधूचा संसार माेडण्‍याची वेळ आली आहे. आग्रा येथील कुटुंब समुपदेशन केंद्रात एक विचित्र प्रकरण पोहोचले. सुनेला गुटखा खाण्याच्या व्यसनामुळे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. (UP News)

संबंधित बातम्या : 

छट्टा येथे राहणाऱ्या एका तरुणीचा शहागंज येथे राहणाऱ्या तरुणाशी नुकताच विवाह झाला. लग्‍नानंतर तिला गुटखा खाण्‍याचे व्‍यसन असल्‍याची माहिती सासर्‍याच्‍या मंडळींना झाली. पतीसह घरातील सर्वजण सुनेला गुटखा खाऊ नको म्हणून समजावण्याचा प्रयत्न करत राहिले; पण तिने कोणाचेही ऐकले नाही. चोरून गुटखा खाणे तिने सुरुच ठेवले. इकडे-तिकडे थुंकताना तिला सासरच्या मंडळींनी पकडले. या प्रकारावरुन तिचा पतीसह सासरच्या मंडळींसाोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेला अन् पतीने तिला माहेरी पाठवले. यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यापासून कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहचले. (UP News)

पतीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप

पतीने पत्नीवर गुटखा खाल्ल्याचा आरोप केला. तर याचवेळी पत्नीने पतीवर गंभीर आरोप केले. पती गुजरातमध्ये काम करतो. येथे त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहेत. तसेच पतीच्या मोबाईलमध्ये महिलांचे नंबर पाहिले आणि त्यांचे बोलणे ऐकले. एवढेच नाही तर मुलगा झाला नाही म्हणून सासरच्या लोकांनी मारहाण केली. अनेक आरोप करून घरातून हाकलून दिले, असा आरोपही तिने केला . तिने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले.

पतीने केला ‘हा’ आरोप

पत्नी सकाळी उठल्याबरोबर घरातील कामे करताना पदराआडून गुटखा खाते आणि इकडे तिकडे थुंकते. घरच्यांनी अनेकदा विरोध केला, समजावूनही सांगितले. पण ती ऐकत नाही. वैतागून मी पत्नीला सोडले. ज्यावरून ती आता माझ्यावर खोटे आरोप करत आहे, असा दावा पतीने केला आहे.

काय म्हणाले समुपदेशक?

दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात कुटुंब समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ.अमित गौर यांनी सांगितले की, “कुटुंबातील एका महिलेने गुटखा खाल्ल्याने लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे. पत्नीने गुटखा खाणे बंद करावे, असे पतीला वाटते; पण पत्नीचे गुटखा खाण्‍याचे व्‍यसन सुटत नाही. सध्या समुपदेशकांच्या स्पष्टीकरणानंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या जोडप्याला पुढील तारीख देण्यात आली आहे.”

हेही वाचा : 

 

Back to top button