खरेतर 2019 मध्ये तयार व रिलिज झालेला, पण दी काश्मीर फाईल, केरळ स्टोरीचे यश कॅश करण्यासाठी म्हणून 72 हुरे हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी पुनर्प्रदर्शित झाला. काही मौलवी युवकांना 72 पर्या उपभोगायला मिळतील, असे आमिष दाखवून सोळा ते एकवीस वयोगटातील युवकांना आत्मघातकी हल्लेखोर बनवतात. दहशतवादाला या धर्मकल्पनेमुळेच प्रोत्साहन मिळते, असे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. त्याला मुस्लिम समुदायातील अनेकांनी हरकत घेतली. चित्रपट प्रदर्शनानंतर मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते सय्यद आरिफ अली महमूद अली यांनी तक्रार दिल्यावरून चित्रपटाच्या निर्मात्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. (Flash Back 2023) दिग्दर्शक संजय पूरण सिंग आणि निर्माता अशोक पंडित यांनी सत्याचा विपर्यास केलेला आहे, अशी भूमिका अली यांनी घेतली. इस्लाम धर्माचा अपमान करणे आणि मुस्लिमांची प्रतिमा मलीन करणे, याच उद्देशांनी हे कथानक प्रेरित असल्याचा दावा अली यांनी केला. गोंधळ, गदारोळ खुप झाला, पण चित्रपटाला धंद्याच्या दृष्टीने काही फायदा झाला नाही. बॉक्स ऑफिसवर 72 हुरे साफ आपटला. निर्माते अशोक पंडित यांना मुंबई पोलिसांना सुरक्षा पुरवावी लागली. हा भुर्दंड बसला तो वेगळा! (Flash Back 2023)
तब्बल 700 कोटी रुपये खर्च करून आदिपुरुष हा थ्रीडी चित्रपट तयार करण्यात आला. राजाराम हे गाणे चित्रपट रिलिज होण्यापूर्वीच लोकांच्या ओठांवर रुळलेले होते, पण प्रत्यक्ष चित्रपटाने निराशाच झाली. ट्रेलर लाँचिंगपासूनच या चित्रपटाला एका अर्थाने अपशकुन झाला, असे म्हणायला हरकत नाही. ट्रेलर लाँचिंगसाठी चित्रपटाचा चमू तिरुपतीच्या बालाजी मंदिरात आलेला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक प्लस हनुमानाची भूमिका साकारलेल्या ओम राऊत याने सीतेची भूमिका करणार्या अभिनेत्री कृती सेनन हिला गुड बाय किस केले. मंदिर परिसरातील हे असे आपल्याकडे दुष्कृत्य मानले जाते. त्यात दोघांनी साकारलेल्या पात्रांकडे पाहण्याचा लोकांचा अत्यंत पवित्र दृष्टीकोन…लोक संतापले. तामिळनाडू भाजप नेते रमेश नायडू यांनी पहिला प्रहार केला. काही पुरोहितांनी राऊत याच्या कृतीचा धिक्कार केला. आगाजच (सुरुवात) वाईट झालेला होता. अंजामही (परिणामही) वाईट झाला. मनोज मुंतशीर यांनी या चित्रपटाचे पटकथा आणि संवादलेखन केलेले होते. महर्षी वाल्मीकी यांची मूळ कथा जशीच्या तशी उचललेली होती, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
मुंतशीर यांनी संवादलेखनाच्या नावावरही चौर्यकर्म तेवढे केलेले होते. कवी कुमार विश्वास यांनी एका महाविद्यालयीन कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर केलेल्या राम या विषयावरील चिंतनपर, पण मजेशीर भाषणातील उतारे मुंतशीर यांनी चित्रपटातून बजरंगबलीच्या तोंडी जसेच्या तसे घातले. कपडा तेरा, तेल तेरा और जलेगी भी तेरी, असे… कुमार आजच्या अनुषंगाने थर्ड पर्सन म्हणून रामायणावर बोलत होते, याचेही भान मुंतशीर यांना राहिले नाही. बजरंग बलीच्या तोंडून कुमार यांचा हा उतारा जसाच्या तसा घातला… रामायणाचे राही मासुम रझा यांचे संवाद ऐकलेल्यांना चित्रपटातील मुंबईया टपोरी हिंदी अजिबात मानवली नाही. मुंतशीर यांनी क्षमा मागितली. चित्रपटाचे नंतर एडिटिंगही झाले, पण वेळ निघून गेलेली होती. स्वत: छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या चित्रपटाला विरोध केला. लोकांनी बुक केलेली तिकीटे रद्द केली.मूळ सोन्याची लंका चित्रपटात कोळशाची, रामाला मिशा असे बरेच काही लोकांना पचले नाही. 700 कोटी खर्चाच्या आदिपुरुषने हिंदी बेल्टमध्ये कसेबसे दीडशे कोटी रुपये जमविले.
दिग्दर्शक सत्यजित रे, वेषभूशाकार भानू अथय्या, संगीतकार ए. आर. रेहमान, गीतकार गुलजार या भारतीयांना याआधी ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर आरआरआर या चित्रपटाने इतिहास घडवला. नाटू-नाटू गीताला बेस्ट ओरिजिनल साँग पुरस्कार मिळाला. गुनित मोंगा आणि कार्तिकी गोंसाल्विस यांचा लघुपट एलिफेंट व्हिस्परर्सही ऑस्करचा मानकरी ठरला.