पुढारी ऑनलाईन डेस्क : पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत व्यभिचाराचे निराधार आरोप करणे, आपल्या मुलाच्या पितृत्वावर संशय व्यक्त करणे आणि मुलाला डीएनए चाचणी करण्यास भाग पाडणे ही एक प्रकारची मानसिक क्रूरताच आहे, असे स्पष्ट करत कर्नाटक
उच्च न्यायालयाने पतीला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केलेला घटस्फोटही रद्द केला आहे.
१९९९ मध्ये विवाह झालेल्या दाम्पत्याला एक मुलगा झाला. पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात २००३ मध्ये अर्ज दाखल केला. पत्नी महिन्यातून किमान १५ दिवस आई-वडिलांसोबत राहते. वारंवार भांडण करते, ती व्यभिचारी आहे. तिने 'काळी जादू' केल्याचाही आरोपही पतीने केला होता. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीवर केलेले व्यभिचाराचे आरोप फेटाळले मात्र क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मंजूर केला होता.
क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मंजुरीच्या निर्णयाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती के.एस. मुदगल आणि केव्ही अरविंद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पत्नीच्या वकिलाने युक्तिवाद केला की, पतीला त्याची शारीरिक स्थिती कमकुवत करण्यासाठी औषधे दिल्याचा आरोप कौटुंबिक न्यायालयाने कोणत्याही रक्त तपासणी किंवा फॉरेन्सिक पुराव्याशिवाय मान्य केला . कोणतीही काळी जादू सिद्ध करणारा कोणताही पुरावा नसल्याचाही त्यांनी स्पष्ट केले.
पत्नीने आई-वडिलांच्या घरी पंधरा दिवस राहण्यास नकार दिल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पत्नी तीन महिन्यांतून एकदा तिच्या पालकांच्या घरी जात असे. एक विवाहित स्त्री तीन महिन्यांतून एकदा तिच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन तिचे आई-वडील, भावंडं आणि कुटुंबातील इतर सदस्यांची विचारपूस करणं स्वाभाविक आहे. ही सर्व कुटुंबांमध्ये सामान्य प्रथा आहे. यावेळी पत्नीने हुंड्याची मागणी केल्याच्या आरोपाचीही न्यायालयाने दखल घेतली. याचिकाकर्त्याने हुंड्याची मागणी केल्यामुळे पत्नीने तीन महिन्यांतून एकदा तिच्या पालकांच्या घरी भेट दिल्यास दोष दिला जाऊ शकत नाही," असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
पतीने पत्नीवर केलेले व्यभिचाराचे आरोप निराधार आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय, मुलाच्या पितृत्वावर संशय, पत्नी आणि मुलाला डीएनए चाचणी करण्यास भाग पाडणे ही मानसिक क्रूरताच आहे. न्यायालयाने पतीचे सर्व आरोप केवळ आरोप असल्याचे मानले. जोपर्यंत क्रूरतेचा आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत घटस्फोट मंजूर करण्याचे कारण नाही." असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
पतीने आपल्या पत्नीवर मानसिक क्रौर्य केले. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून क्रूरतेचा आरोप करत घटस्फोटाची याचिका दाखल केली. त्याच्या वागणुकीला मोठी किंमत मोजावी लागेल, असे स्पष्ट करत न्यायालयाने घटस्फोटाचा आदेश बाजूला ठेवत पतीवर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
हेही वाचा :