अजब पोपटाची गजब कहाणी: ’मिठू-मिठू’ दे अन् घटस्फोट घे | पुढारी

अजब पोपटाची गजब कहाणी: ’मिठू-मिठू’ दे अन् घटस्फोट घे

पुणे : एखाद्याचे पक्षीप्रेम किती असू शकते, फार-फार तर तो काही पक्ष्यांचा सांभाळ करेल. मात्र, एका पक्ष्याच्या ताब्यासाठी घटस्फोटाचा निकाल रखडून राहण्याचा प्रकार तसा दुर्मीळच. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात असाच एक प्रकार समोर आला आहे. घटस्फोटाच्या प्रकरणात पती व पत्नी या दोघांनीही पोटगी, स्त्रीधन, स्थावर व जंगम मालमत्तेवरील हक्क सोडले. मात्र, लग्नापूर्वी पत्नीला दिलेला आफ्रिकन पोपट परत करण्यासाठी पतीने हट्ट धरला. समुपदेशनादरम्यान पत्नीनेही पतीला पोपट सुपूर्त करण्याचे मान्य केले अन् पोपटामुळे अडकलेला काडीमोड क्षणार्धात मंजूर झाला.
प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर एकमेकांच्या सुखादु:खात साथ देणारे दाम्पत्य म्हणजे रणविजय आणि गीतांजली (नावे बदलेली आहेत). दोघांनीही 11 डिसेंबर 2019 रोजी पुण्यातील विवाह निबंधक कार्यालयात लग्नगाठ बांधली. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना वैचारिक मतभेदामुळे 14 सप्टेंबर 2021 पासून वेगळे राहू लागले. नातेवाईक तसेच कुटुंबीयांच्या मध्यस्थीनंतरही त्यांना एकत्र येण्यामध्ये उत्साह राहिला नाही. अखेर, गीतांजलीने घटस्फोट मिळावा यासाठी 9 डिसेंबर 2022 रोजी न्यायालयात अर्ज केला. यादरम्यान, गीतांजलीसह रणविजय यासही समुपदेशनासाठी पाठविण्यात आले.
त्यानंतरही पती घटस्फोटावर ठाम राहिला. गीतांजलीने रणविजयकडून मिळणारा पोटगीचा हक्क सोडून देत दिवाणी अथवा फौजदारी दावा दाखल न करण्याचे मान्य केले. पोपट दिल्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पत्नीनेही पोपट देण्यास संमती दिली. त्यानंतर विवाह समुपदेशक असलेल्या शशांक मराठे यांनी 16 नोव्हेंबर 2023 पूर्वी पोपट पतीकडे सुपूर्त करण्यात यावा, असे नमूद करत संबंधित अहवाल कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांच्याकडे पाठविला. घटस्फोटाच्या अर्जास सहा महिने पूर्ण झाले होते. दोघेही एक वर्षापेक्षा जास्त काळ विभक्त राहत असल्याने न्यायालयानेही त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले.
पतीकडून घटस्फोट मिळावा यासाठी पत्नीने न्यायालयात दावा दाखल केला होता. पती नांदविण्यास तयार होता. मात्र, ती घटस्फोटावर ठाम होती. त्यामुळे, पतीनेही लग्नापूर्वी दिलेला पोपट परत केल्यासच घटस्फोट देण्याची भूमिका घेतली. समुपदेशनादरम्यान, पत्नीने पोपटाचा ताबा पतीला देण्याचे मान्य केले. त्याबाबतच्या अटी-शर्ती दोघांनाही मान्य होत्या.
– अ‍ॅड. भाग्यश्री गुजर-मुळे (पतीतर्फे वकील)

हेही वाचा

Back to top button