एक आई, दोन गर्भ अन् निरोगी जुळ्यांचा जन्म! | पुढारी

एक आई, दोन गर्भ अन् निरोगी जुळ्यांचा जन्म!

अलाबामा, वृत्तसंस्था : अमेरिकेतील अलाबामा येथील एका दुर्मीळ घटनेत 20 तासांच्या प्रसूती वेदनेनंतर एका महिलेने 19 डिसेंबरला तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला; तर 20 डिसेंबर रोजी दुसर्‍या मुलाला जन्म दिला. वैद्यकीयशास्त्रात स्त्रीला दोन गर्भ असल्याची प्रकरणे फारच दुर्मीळ मानली जातात. सहसा, जुळे एकाच गर्भाशयात एकत्र जन्माला आल्याचे आजवर बर्‍याचदा झाले आहे; पण दोन्ही गर्भांतून जन्म दिला जाण्याची ही घटना अगदीच दुर्मीळ आहे. केल्सी हेचर असे दोन गर्भांतून जुळ्यांना जन्म देणार्‍या या महिलेचे नाव आहे.

वैद्यकीय भाषेत मुलांना भ्रातृ (फॅटर्नल) जुळे म्हटले जाते. वेगवेगळ्या अंड्यांपासून जन्मलेल्या बाळांना ‘फॅटर्नल’ असे म्हणतात. अशी घटना तेव्हा घडते, जेव्हा दोन किंवा अधिक अंडी वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे फलित होतात. अशी जुळी मुले एकसारखी किंवा वेगळी दिसू शकतात.

लंडनच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील स्त्रीरोग तज्ज्ञ प्रा. अस्मा खलील यांच्या मते, दुहेरी गर्भाच्या स्थितीला ‘गर्भाशय डिडेल्फीस’ असे म्हणतात. बहुतेक महिलांना याची माहिती नसते; पण काही लक्षणे जाणवली, तर दुहेरी गर्भाशयाची शक्यता असते. केल्सीला वयाच्या 17 व्या वर्षी दोन गर्भ असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिने आता जुळ्यांना जन्म दिला आहे.

Back to top button