कोल्हापूर : फुटबॉल सामन्यानंतर राडा | पुढारी

कोल्हापूर : फुटबॉल सामन्यानंतर राडा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अर्वाच्य शिवीगाळ, अश्लील हावभावांसह प्रचंड हुल्लडबाजीनंतर सामना 1-1 असा बरोबरीत झाल्यावर पंचांच्या निर्णयावर अक्षेप घेत हुल्लडबाजी झाली. यानंतर मैदानात खेळाडू व प्रेक्षक गॅलरीत शेकडो समर्थक एकमेकांना भिडले. मोठी धावपळ व चेंगराचेंगरी झाली. यानंतर दगड, चप्पल आणि पाण्याच्या बाटल्यांची फेकाफेक झाली. यामुळे वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले. मैदानाबाहेरही धावपळ आणि वाहनांची मोडतोड करण्यात आली. अखेर पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेतील शनिवारचा हायव्होल्टेज सामना शनिवारी शिवाजी तरुण मंडळविरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात झाला. अटीतटीचा सामना संपण्यास काही मिनिटांचा अवधी असताना ‘पाटाकडील’कडून गोल झाला. अवघ्या पाच-सहा मिनिटांतच या गोलची परतफेड शिवाजी मंडळकडून झाली. यामुळे सामना 1-1 असा बरोबरीत झाला.

दगडफेकीत अनेक जण जखमी

पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत खेळाडूंनी त्यांच्याशी हुज्जत घातली. अनेकांनी शिवीगाळही केली. इतकेच नव्हे, तर दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मैदानातील खेळाडूंच्या या कृतीमुळे त्यांच्या समर्थकांनाही चांगलाच चेव चढला. दोन्ही संघांचे समर्थक आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात हातात मिळेल ती वस्तू भिरकावण्यास सुरुवात केली. चप्पल, पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर प्रेक्षक गॅलरीतील स्लॅबच्या सिमेंट व विटांचे तुकडेही मैदानावर भिरकावण्यात आले. या दगडफेकीत काही जण जखमी झाले.

दरम्यान, पोलिसांनी लाठीमार करत समर्थकांना मैदानाबाहेर काढले. मैदानाबाहेरही समर्थकांनी हुल्लडबाजी सुरूच ठेवली. दुचाकी पाडून नुकसान केले. इतकेच नव्हे, तर प्रतिस्पर्धी समर्थकांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यामुळे पोलिसांनी दोन्हीकडील समर्थकांवर लाठीमार करून त्यांना दूरवर पांगवले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

25 जणांवर गुन्हा दाखल

शिवाजी तरुण मंडळविरुद्ध पाटाकडील तालीम यांच्यात शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यादरम्यान खेळाडूंमध्ये वादाचा प्रकार घडला. तसेच सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर समर्थकांमध्ये याचे पडसाद उमटले. दगडफेक, चप्पलफेकीचा प्रकार घडला. याप्रकरणी संदीप सरनाईक (रा. मंगळवार पेठ) यांच्यासह अनोळखी 25 जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Back to top button