पाचगणी शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा कचरामुक्त शहर पुरस्कार जाहीर | पुढारी

पाचगणी शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा कचरामुक्त शहर पुरस्कार जाहीर

कुडाळ : पुढारी वृत्‍तसेवा

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021, आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे थंड हवेचे ठिकाण पाचगणी शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी पाचगणी शहराच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर यांच्या नेतृत्वाखाली पाचगणी नगरपरिषद देशपातळीवर स्वच्छ सुंदर पाचगणी म्हणून गौरवण्यात आले आहे. 2021 या वर्षीदेखील लक्ष्मी ताई कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा गिरीस्थान, थंड हवेचे ठिकाण, पर्यटन स्थळ पाचगणी शहराला देशपातळीवर गौरवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सातारा, मलकापूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, कराड या ७ शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे (GFC) चे ३ स्टार रँकिंग प्राप्त झाले असून, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे या शहरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

कचरा विलागिकरणाचे प्रमाण 100 टक्के

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत  पाचगणी शहरात घरगुती कचरा हा वेगळा केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा, ई कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. शहरातील नागरिक हे स्वत:ही घरच्या घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो. प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना पुर्नवापर योग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्‍या आहेत.

कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापर

कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

पाचगणी नगरपालिकेवर नेतृत्व करत असताना सर्व नागरिकांच्या सहकार्याने नगरसेवकांच्या पाठबळामुळेच पाचगणी नगरपालिका व पाजगणी शहर कचरामुक्त करण्यात मला यश आले  आणि हे सर्व श्रेय पाचगणीच्या जनतेला जाते.

कारण पाचगणीच्या जनतेने मनामध्ये निर्धार केला होता. पाचगणी शहर देशपातळीवर गौरवले जावे यासाठी सर्व कष्ट व परिश्रम परिसरात पाचगणीच्या जनतेने केले आहे. याचे सर्व श्रेय पाचगणीच्या जनतेला आहे. त्यामुळे पाचगणीच्या जनतेचे मनापासून अभिनंदन एक लोकप्रतिनिधी व पाचगणीचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मला मिळालं हीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

नगराध्यक्ष, लक्ष्मी ताई कराडकर

Back to top button